लॉकडाऊनमध्ये खतांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार – जिल्हाधिकारी उदय चौधरी
प्रकाशन दिनांक : 11/07/2020
औरंगाबाद (जिमाका) दि. 11 :- जिल्ह्यात खतांचा पुरवठा लॉकडाऊन कालावधीतही सुरळीतपणे सुरू राहणार असून शेतकऱ्यांना सुलभतेने आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील लॉकडाऊन कालावधीत करण्यात येणाऱ्या खत पुरवठा व वितरणाबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संबधिताना विविध सूचना दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह खत कंपन्याचे प्रतिनिधी, माथाडी कामगार तसेच ट्रक वाहतूक युनियनचे प्रतिनिधी, रासायनिक खत कंपन्यांचे वाहतूक व हाताळणी संस्था उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले जिल्ह्यात युरियासह इतर खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता राहणार आहे. या लॉकडाऊन कालावधीत खताच्या पुरवठ्यावर कुठल्याही प्रकारे बंधने येणार नसून सर्व शेतकऱ्यांना सुलभतेने गरजेनूसार युरिया तसेच इतर खते घेता येणार आहे. त्यादृष्टीने माथाडी कामगार, खत कंपनी प्रतिनिधी, ट्रक चालक यांनी खत वितरणाचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे. ट्रक चालक, माथाडी कामगार, खत कंपन्यांचे कर्मचारी, वाहतूक व हाताळणी संस्थेचे कर्मचारी याना पास देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या व पोलिस विभागाकडून खत वितरणामध्ये कुठलीही अडचण येणार नसल्याची खात्री दिली. लॉकडाऊन कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यासाठी नियोजनाप्रमाणे येणारे खत कंपन्यांनी आणावे व लॉकडाऊन आहे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची रेल्वे रेक दुसऱ्या जील्ह्याकडे वळवू नये अश्या सूचना खत कंपन्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा होणार असून आर. सी. एफ, कृभको, ई फ को व जी एस एफ सी या चार खत कंपन्यांचे 7500 ते 8000 टन युरिया खत औरंगाबाद जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंतता बाळगावी. कृषी विभागाने युरिया खताच्या मागणीनूसार पुरवठा करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधिताना दिल्या.
