बंद

लंपी स्किन आजाराबाबत सतर्क राहा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 06/09/2022

औरंगाबाद, दिनांक 05 (जिमाका) : औरंगाबाद तालुक्यातील तिसगाव, सिल्लोडमधी बाळापूर, सोयगावातील फर्दापूर या ठिकाणी जनवारांमध्ये लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. या रोगाचा प्रार्दुभाव वेगाने पसरू नये,  यासाठी पशुपालकांनी घेण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधयक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

लंपी स्किन या  रोगात जनावरांना खूप ताप येतो. जनावर चारा, पाणी कमी घेते अथवा घेणे बंद करते, नाका डोळ्यातून चिकट स्त्राव येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात. पायावर सूज येऊ न जनावर लंगडते अशी सर्वसाधारण लक्षणे दिसून येतात. बाधित जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करुन त्याची सूचना नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यास देऊन पुढील उपचार करून घ्यावेत. या रोगाचा प्रसार डास, माशा, गोचिड, चिलटे आदींमार्फत होत असल्याने गोठ्याच्या व जनावरांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. गोठ्यात बाह्य किटकनाशकाची फवारणी करावी. या रोगाची लक्षणे, उपचार प्रतिबंधक उपाय आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या जनावरांवर वेळीच उपचार करून आजारी जनावरांना वेगळे ठेवावे. जिल्ह्यात या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनतर्फे संपूर्ण उपाययोजना करण्यात येत आहेत.

रोग नियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. बाधित गावांमध्ये, बाधित गावापासून पाच किलोमीटर परिसरात येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना नजिकच्या पशुवैद्यकच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तिसगाव, बाळापूर व फर्दापूर गावात व त्या गावांच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे.  बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे. रोग प्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी.डी.झोड यांनी सांगितले. प्राण्यांमधील संक्रमक आणि सांसर्गिक रोगास प्रातिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंपी स्किन डिसीज रोग प्रादर्भावाची माहिती पशु पालक, इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत यांनी तत्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस, प्रशासनास देणे बंधनकारक असल्याचेही श्री. चव्हाण यांनी म्हणाले.