बंद

रेमेडीसीवीर इंजेक्शन आवश्यक प्रमाणात उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 29/09/2020

  • जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 87 टक्क्यांवर

औरंगाबाद, दि.28 (जिमाका) :-  जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून  88.87 टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचा दर गेला आहे.  प्रशासन प्राधान्याने रुग्ण बरे होण्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सीजन उपलब्धता पूरेशी ठेवण्यासाठी कार्यवाही करत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, खा. डॉ. भागवत कराड ,आ. अतुल सावे, आ.अंबादास दानवे,मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय ,पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, घाटी रुग्णालयाचे डॉ. झीने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. सुनील चव्हाण म्हणाले, मागणीप्रमाणे ऑक्सीजन उपलब्धता पूरक ठेवण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सीजन उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.तसेच रुग्णांसाठी आवश्यक प्रमाणात रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध ठेवण्याची कटाक्षाने खबरदारी घेतल्या जात असून घाटी, जिल्हा रुग्णालयासाठी मोठया संख्येने हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी खरेदी आदेश दिले आहेत. दर दिवशी इंजेक्शनची उपलब्धता , मागणी, साठा नियंत्रीत करण्याचे काम अन्न व औषध प्रशासनामार्फत चोखपणे होत आहे.आतापर्यत जिल्ह्या बाहेरील 1600 रुग्ण बरे होऊन गेले आहेत. तसेच रुग्ण वाढीच्या प्रमाणात ऑक्सीजनसाठा उपलब्ध होण्यासाठी सर्व आवश्यक उपाय करण्यात येत असून लिक्विड ऑक्सीजन उत्पादन प्रक्रिया सुरु करण्यासाठी उद्योजकांनी पुढे येणे आवश्यक आहे. सध्या 15 टन अधिकचा ऑक्सीजन राखीव ठेवण्यासाठीची व्यवस्था जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.

तसेच रुग्णांना अधिक तत्परतेने उपचार सुविधा देण्याच्या दृष्टीने सर्व आयसीयु डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येणार असून वेबिनारद्वारे कोरोना उपचार करत असलेल्या सर्व डॉक्टरांना हे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. मा. मुख्यमंत्री यांनी निर्देशित केल्याप्रमाणे मास्क वापर, अंतराचे पालन आणि माझे कुंटुंब माझी जबाबदारी मोहीमेतंर्गत व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रशासन सर्व यंत्रणांद्वारे सज्ज असून लोकप्रतिनिधींनीही त्यात ही मोहीम अधिक प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन ही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.

खा. कराड यांनी रेमडीसीवीर इंजेक्शन पूरक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यावर विशेष लक्ष देण्याचे सांगून आयसीयु डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याचे सूचीत केले. खा. जलील यांनी रेमेडीसीवर इंजेक्शन योग्य त्या दराने रुग्णांना उपलब्ध होत आहे का यावर नियंत्रण ठेवत त्याची कुठल्याही प्रकारे चढत्या भावाने विक्री होणार नाही यासाठी अन्न व औषध प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच घाटीच्या अतिविशेष उपचार इमारतीमध्ये खिडक्यांना तातडीने जाळ्या बसवून तेथील रुग्णांची सुरक्षितता वाढवावी,असे सूचीत केले.

आ. सावे यांनी अन्न व औषध प्रशासनाने रेमेडीसीवीर इतर औषधांच्या वितरण व्यवस्था नियंत्रणासाठी खबरदारी घेऊन ज्या रुग्णालयाला गरज आहे, तिथे प्राधान्याने इंजेक्शन्स उपलब्ध करुन द्यावी. अत्यावश्यक वेळेसाठी इंजेक्शनचा राखीव साठा ठेवावा, असे सूचित केले. आ. दानवे यांनी रुग्णांना गरजेच्या वेळी इंजेक्शन  सुलभतेने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औषध उपलब्धता ठेवण्याबाबत सूचित केले. तसेच खासगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहीत केल्यानुसार  त्यांना तातडीने रुजू  होण्याच्या अनुषगांने कार्यवाही करण्याचे सांगितले.

 जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून सध्या 88.87 टक्के दराने रूग्ण बरे होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर 2.69 टक्के वर मृत्यूदर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर 85721 तर ॲण्टीजन चाचण्या 267567 या प्रमाणे एकुण चाचण्या 353288 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 108 ठिकाणी 13713 आयसोलेशन बेड तर 2031 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 526 आयसीयु बेड तर 230 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

रेमेडीसीवीर इंजेक्शन आवश्यक प्रमाणात उपलब्ध