रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 05/04/2021
औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) :- सध्या जिल्ह्यात 4 रुग्णालयांच्या माध्यमातून 61 केएल एवढी लिक्वीड ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. शिवाय 33 केएल एवढ्या साठवणूक क्षमतेचे काम सुरू आहे. सध्याची कोविड 19 ची परिस्थिती पाहता जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
आकस्मिक परिस्थितीमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरळीत राहणसाठी करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने, नोडल अधिकारी श्रीमंत हारकर तसेच संबंधित ऑॅक्सिजन वितरण करणा-या कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
सुरूवातीला नोडल अधिकारी श्रीमंत हारकर यांनी जिल्हृयातील ऑक्सिजन लिक्वीड तसेच सिलेंडर गॅसबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. जिल्ह्यात गॅस पुरवठा करणाऱ्या सागर गॅस, रुख्मीनी मेटल, सृशील गॅस आदी कंपन्यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही प्रमाणात गॅस राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. यामध्ये सागर गॅस कंपनीने 100, सृशील गॅस कंपनीने 30 तर रुख्मीणी मेटल या कंपनीने 50 जंबो सिलेंडर राखीव ठेवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता जिलह्यात गॅसचा पुरवठा कमी पडता कामा नये. सध्या जिल्ह्याला INOX चाकण आणि लिंडे जेएसडब्ल्यू स्टील रायगड या दोन ठिकाणांहून गॅस पुरवठा होत आहे. हा पुरवठा नियमित् आणि कोणत्याही अडथळा विना होण्यासाठी उपाय योजना करण्यात येत आहेत. टँकरच्या प्रवासात अडथळा निर्माण हेाऊ नये म्हणून टँकरला लाल दिवा, सायरन लावण्यात येतील तसेच आवश्यकता भासल्यास एस्कॉर्टस सेवा देखील पुरविण्यात येईल जेणेकरुन टँकरला ग्रीन कॅरिडॉर मिळेल आणि वेळेत टँकर जिल्ह्यात पोहचेल. तसेच पुरवठा मोठ्या प्रमाणात हेाण्यासाठी अधिकच्या टँकर खरेदीला देखील शासनाने मान्यता दिली असल्याचे सांगूण जिल्हाधिकारी म्हणाले की, केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाने नायट्रोजन तसेच अर्गोनची वाहतूक करणाऱ्या क्रायोजनिक टॅकर्सला ऑक्सिजन गॅसची वाहतुक करण्यास परवानगी दिली आहे. तसेच जिल्हा प्रशासनान 1500 जंबो सिलेंडरची खरेदी करण्याची प्रक्रीया सुरू केली असून गॅसचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी स्टरलाईट कंपनीचे 4 केएल, आरएल स्टीलचे 3 केएल एवढा गँस अधिग्रहित केला असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.