बंद

रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या कराव्यात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 07/05/2021

औरंगाबाद, दि.07, (जिमाका):- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे, मात्र भविष्यातील कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या गावात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

करमाड येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन रुग्णालयाची त्यानंतर ऑक्सीजन प्लान्ट उभा करण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसिलदार ज्योती पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक अपर्णा रंजनकर, विक्रम ठाकरे, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळ यांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. चव्हाण यांनी लसीकरण, कोरोना चाचण्या, ऑक्सीजन, रुग्णालयात उपलब्ध असलेले मनुष्यबळ आदी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत येथील कोरोना रुग्णांशी संवाद साधून त्यांना कुठलीही अडचण नसल्याची खात्री करुन घेतली.

तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याचे कळताच येत्या दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामीण भागात होत असलेल्या लग्न समारंभात गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच सकाळी अकरा नंतर इतर आवश्यक असणारी दुकाने ही खुली राहणार नाही याची काळजी घेत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.

वैद्यकीय अधीक्षक अपर्णा रंजनकर यांनी आतापर्यंत 2 हजार 486 जणांची स्वॅब तपासणी झाली असून त्यातील 577 कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आता पर्यंत या ग्रामीण रुग्णांलयात 59 कोरोना बाधीतावर उपचार करण्यात आले असून 29 रुग्णांवर उपचार सुरु असून 23 रुग्ण कोरोनामुक्त झालेआहे. तर येथील 7 रुग्णांना येथून जिल्हा रुग्णालय औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. तर सध्या या रुग्णालयात 3 ऑक्सीजन सिलेंडर असून अजून 5 ऑक्सीजन सिलेंडर जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध होणार असल्याची माहिती श्रीमती रंजनकर यांनी यावेळी दिली.

रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या कराव्यात