बंद

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवा – अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 08/12/2020

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात परिणामकारकरित्या राबवावा. सर्व शैक्षणिक संस्थांनी 100 यार्डच्या परिघात तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन विक्रीस प्रतिबंध असल्याचे फलक लावावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास प्रतिबंधासाठी कार्यालयात उल्लंघण करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय वाघ, छावणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रांत मोरे, अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.अजिंठेकर, सहायक पोलिस निरीक्षक एच.बी.बोराडे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे डॉ.आकाश कासलीवाल, मनपाचे अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्रकुमार घडमोडे,  एल.एस.नन्वरे, शिक्षण विस्तार अधिकारी एल.ए. सोफी, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड आदींची उपस्थिती होती.

बैठकीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत  सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्याबाबत नियंत्रण कक्षाने याबाबत व्यापक जनजागृती करावी. शासकीय कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमाबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम सातत्याने करावेत. विविध कार्यशाळांचे आयोजन करावे, शासकीय, निमशासकीय कार्यालयांना वारंवार या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पत्रव्यवहार करावा. शालेय परिसरात या कायद्याबाबत अधिक कडक अंमलबजावणी करावी, असेही श्री. गव्हाणे यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देशित केले.

मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन श्री. काकड यांनी करून सद्यस्थितीतील कायद्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती सादर केली. यावेळी जिल्हा‍ शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनीही सूचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. काकड यांनी केले. आभार श्री.कुलकर्णी यांनी मानले.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवा