रानभाजी महोत्सवाचे 9 ऑगस्ट रोजी आयोजन
प्रकाशन दिनांक : 07/08/2020
औरंगाबाद, दि.7, (जिमाका):- पावसाळ्यातील रानभाज्यांची व त्यांच्या पाककृतीची (रेसीपी) नविन पिढीला माहिती व्हावी, या रानभाज्यांच्या विक्रीस चालना मिळावी व ग्रामीण लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण व्हावे, या उद्देशाने कृषि विभाग, आत्मा कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद व गांधेली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद येथे दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रानभाज्यांचे नमुने, त्यांच्या पाककृती (रेसीपी)सह कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद येथे हजर रहावे. तसेच रानभाज्या महोत्सवामध्ये वेगवेगळया रानभाज्या पहायला तर मिळणार आहेच. परंतु त्यांची विक्री पण होणार आहे. त्याचबरोबर भाजीपाल्याच्या पाककृतीचे प्रात्यक्षिक फेसबुक व युट्युबवर लाईव देखील दाखविले जाणार आहे. त्यामुळे रानभाज्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक(आत्मा), औरंगाबादचे डॉ. तुकाराम मोटे, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद व गांधेलीचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व डॉ. वसंत देशमुख यांनी केले आहे.
पावसाळा सुरु झाला की शेतात, रानावनात शेकडोने रानभाज्या उगवतात, करटोली, घोळ, आंबुशीकुर्डु, केना, सुरण, दिंडा, कुडा, टाकळा, पाथ्री, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उंबर, चिगुर , सराटे, मयाळू अशा कितीतरी रानभाज्या आहेत. आपल्या पुर्वजांना या रानभाज्या माहिती होत्या व त्यांची भाजी कशी तयार करायची यांच्या पध्दतीपण माहिती होत्या. आत्ताच्या पिढींना या भाज्यांची ओळखही नाही व त्यापासून भाजी कशी बनवायची याची माहिती नाही. आपल्या पुर्वजांचा हा ठेवा लुप्त होतो की काय याची शंका निर्माण होते . या रानभाज्यांचे वैशिष्टये म्हणजे या भाज्या कुठल्याही रासायनिक खत अथवा किटकनाशकांचा वापर न केलेल्या असतात. त्याचबरोबर त्या चविष्ट, आरोग्यदायी असतात. अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म या रानभाज्यामध्ये आहे. या रानभाज्यामध्ये ऋतुमानाप्रमाणे आहारात बदलपण करता येतो.
या रानभाज्या महोत्सवामध्ये वैयक्तिक महिला, महिला बचत गट, शेतकरी गटांचा सहभाग घेतला जाणार आहे. येथे उत्कृष्ट रानभाज्यांचे नमुने आणनाऱ्या व रानभाज्यांची चांगल्याप्रकारे भाजी तयार करण्याची पाककृती करणाऱ्या महिलांना बक्षिसपण दिले जाणार आहे. रानभाज्यांची उत्कृष्ट नमुने व उत्कृष्ट पाककृतीची निवड करण्यासाठी तज्ञांची समिती गठित करण्यात आली आहे. तरी या रानभाजी महोत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.