राज्य सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च रोजी
प्रकाशन दिनांक : 17/03/2021
औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) :- उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्या मार्फत आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020, रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी औरंगाबाद जिल्ह्यात 59 शाळा, महाविदयालयात आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेसाठी 19656 उमेदवारांना आयोगा मार्फत प्रवेश देण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी सकाळ सत्रात 10 ते 12 व दुपार सत्रात दुपारी 03 ते 05 या प्रमाणे आहे. परीक्षेकरिता एकूण 2167 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
परीक्षेकरिता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांना कोविड-19 विषाणूच्या अनुषंगाने Extra Protective Kit, परीक्षेकरिता उपस्थित राहणा-या प्रत्येक उमेदवाराकरीता Basic Covid Kit व फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांच्या वापराकरिता Personal Protective Equipment Kit आयोगा मार्फत पुरविण्यात येणार आहे.
अंशतःलॉकडाऊन च्या अनुषंगाने उमेदवार व त्यांचे पालक यांना आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे वितरित करण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र हे त्यांच्यासाठी प्रवासाचा पास म्हणून ग्राहय धरण्यात येईल.
परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्या पुराव्याकरिता आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक जवळ बाळगणे व तसे तपासणीच्यावेळी सादर करणे अनिवार्य राहिल.
दिनांक 14 मार्च 2021 रोजी परीक्षेच्या कामाकरिता नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांचे नेमणुकीचे आदेशच परीक्षेचा सुधारीत दिनांक रविवार, 21 मार्च 2021 करीता कायम राहील. सदर आदेश 20 व 21 मार्च 2021 या दिवसी प्रवासाकरिता पास म्हणून ग्राहय धरण्यात येईल. तथापि, त्यासोबत संबंधितांनी मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे व तपासणीच्यावेळी सादर करणे अनिवार्य असेल.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांचे आदेश जा.क्र2021/जिआव्य/जि.नि.कक्ष/कावि दिनांक 07/03/2021 अन्वये औरंगाबाद जिल्हयात दिनांक 20 व 21 मार्च 2021 रोजी हॉटेल्स, रेस्टॉरंट पूर्णतः बंद असल्यामुळे उमेदवारांनी भोजनाचे पदार्थ सोबत आणावेत, असे आवाहन रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी केले आहे.