बंद

रस्त्यांची कामे लवकरच पूर्णत्वास नेणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 20/01/2021

औरंगाबाद, दिनांक 20 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यात येतील. तसेच आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असणारी शुद्ध हवा याबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उद्योजकांना दिली.

औरंगाबाद फर्स्ट संस्थेमार्फत रस्ते व वाहतूक विषयाशी संबंधित आयोजित बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. याप्रसंगी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता डी.डी.उकिर्डे, महावितरणचे मुख्य अभियंता भूजंग खंदारे, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, हेमंत कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष प्रितिश चटर्जी, उद्योजक ऋषी बागला, राम भोगले, हेमंत लांडगे आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गांची कामे गतीने पूर्णत्वास जात आहेत. समृद्धी महामार्गातील औरंगाबाद-शिर्डी रस्ताही लवकरच पूर्णत्वास येणार असल्याने त्यातून उद्योगांना चालना मिळणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.  

पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येतील. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही. तसेच अपघाताचे प्रमाणही कमी करण्यावर प्रशासनाचा अधिक भर असेल. ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ यानुसार नागरिकांनीदेखील सजग राहून प्रशासनाला सूचना केल्यास त्यांच्या सूचनांचे स्वागतच असेल, असेही डॉ.गुप्ता म्हणाले.

मनपा आयुक्त पांडेय म्हणाले, शहरात विविध ठिकाणी कोट्यवधी रूपयांच्या रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. रस्त्याच्या गुणवत्तेची देखील तपासणी करण्यात येत आहे. शहराला सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नुकतीच शासनाने पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. सदरील योजना पूर्णत्वास गेल्यास नागरिकांना टँकरची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय शहराला भेडसावणारा कचरा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शहरात चिकलठाणा, पडेगाव, कांचनवाडी येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. हर्सुल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे काम सुरू आहे, ते सहा महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे शहराचा कचरा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल. त्याचबरोबर झाल्टा आणि पडेगाव येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू आहे. रस्त्यांवरील पथदिवे सुयोग्य स्थितीत कार्यान्वित आहेत. यासह मनपाच्यावतीने यापुढे माहिती तंत्रज्ञान सुविधेवर भर देण्यात येऊन घरपोच दाखले पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वृक्ष लागवड, हॉकर्स, पार्किंग क्षेत्र, पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक वारशांचे जपणूक, जतन आदी कामे सुरू आहेत. वाहतूक व्यवस्थेत वाळूज-शेंद्रा-बिडकीनपर्यंत शहर बस धावत आहेत, असेही श्री. पांडेय म्हणाले.

श्री. उकिर्डे यांनी शहरातील रस्ते आणि श्री. खंदारे यांनी वीजविषयक बाबींवर उपस्थितांशी सविस्तर चर्चा केली. सुरूवातीला श्री.चटर्जी यांनी वाळूज रस्त्यासह शहरातील वाहतूक व्यवस्था आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी उद्योजक श्री. बागला आणि उद्योजक श्री. भोगले यांनीही शहराच्या विकासाच्यादृष्टीने विविध उपाययोजना सूचविल्या.