बंद

‘योग दिन’ नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 16/06/2021

औरंगाबाद, (जिमाका)दि. 16: जिल्ह्यात 21 जून रोजी ‘योग दिन’ कोरोनाचे नियम पाळून नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित योग दिनाच्या पूर्वतयारी बाबतच्या आढावा  बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी संबंधितांना सूचित केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे,निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह  विविध योग  संघटनांचे प्रतिनिधी, योग शिक्षक,विविध क्रीडा संघटनेचे अध्यक्ष ,प्रतिनिधी व खेळाडू उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले की कोवीड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत योग दिन अधिकाधिक नागरिकांच्या सहभागातून उत्साहात साजरा करा. योग हा शारीरीक, मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीतही प्राचीन काळापासून योगाला विशेष महत्व  आहे. सध्या कोरोना संसर्गात आपली प्रतिकार शक्ती आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता मजबूत ठेवणे गरजेचे बनले आहे. त्या पार्श्वभूमीवरही सर्वांनी नियमित योगासने, योग, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने 21 जून रोजी योग दिनामध्ये सर्वांना सक्रियपणे सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबधितांना दिल्या.

तसेच योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये  मास्क वापरणे,शारीरिक अंतर पाळणे यासारख्या नियमांचे पालन करत विविध पध्दतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. यामध्ये विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात येणाऱ्या योग दिनाच्या कार्यक्रमात कोवीडच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावे. तसेच अधिक संख्येने त्या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता यावे, या दृष्टीने त्याचे थेट प्रक्षेपण विविध ठिकाणांवर दाखविण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्यातील सायकलिंग संघटनांनी योग दिनानिमित्त विशेष सायकल रॅलीचे आयोजन करत वातावरण निर्मिती करावी. विविध क्रिडा संघटना, योग शिक्षक, योग प्रसार संघटनांनी परस्पर समन्वयातून क्रिडा विभागासोबत वेगवेगळ्या ठिकाणी 21 जून रोजी योग दिनाचे उपक्रम राबवावे. घरोघरी कुटुंबियांनी योग साधना, आसने करुन त्याचे व्हिडीओ, फोटो प्रसारीत करावे. जेणेकरुन जिल्हयात या निमित्त उत्साहाचे, आरोग्यदायी चैतन्याचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. त्याचसोबत या दिवसानिमित्त विविध ठिकाणी स्वयंप्रेरणेतून स्वच्छता मोहिम राबवण्याचे नियोजन  व त्याची प्रसिद्धी करण्याबाबतही श्री. चव्हाण यांनी सूचित केले.

यावेळी श्रीमती नावंदे यांच्यासह सर्व संबंधितांनी योग दिनानिमित्त उपक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती दिली. तसेच योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना योग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी  20 जून रोजी सकाळी 7  वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत  क्रांती चौक ते जिल्हाधिकरी कार्यालय  पर्यंत सायकल रॅलीचे  आयोजन करण्यात आलेले असल्याचे  जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी यावेळी सांगितले.

‘योग दिन’ नाविन्यपूर्ण उपक्रमांसह उत्साहात साजरा करावा