बंद

मुख्यमंत्र्यांकडील तक्रारींचे तत्काळ निवारण करा -एस.व्ही.आर.श्रीनिवास

प्रकाशन दिनांक : 16/05/2019

औरंगाबाद, दि.14 (जिमाका) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुष्काळ निवारणा संदर्भात जिल्ह्यातील सरपंचांनी समस्या मांडल्या. या समस्यांची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाचे प्राधान्याने पालन करावे व तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्ह्याचे पालक सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी आज येथे केल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीचा श्री.श्रीनिवास यांनी आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम, आदींसह मनरेगा, वन, जलसंधारण, महसूल विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती.

सुरूवातीला जिल्हाधिकारी श्री.चौधरी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, प्रकल्पातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, टँकर, विहिरींचे अधिग्रहण, पाणीपुरवठा, चाराछावणी, आदींबाबत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती श्री.श्रीनिवास यांना दिली. त्यानंतर श्री.श्रीनिवास यांनी विभाग निहाय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आणि दुष्काळात करावयाची कामे यांना सर्वांनी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या. कृषी विभागामार्फत खरीप पीक आढाव्याबाबतची माहितीही यावेळी श्री.मोटे यांनी श्री.श्रीनिवास यांना दिली. जिल्ह्यातील दुष्काळासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत श्री.श्रीनिवास यांनी समाधान व्यक्त केले.

******

मुख्यमंत्र्यांकडील तक्रारींचे तत्काळ निवारण करा - एस.व्ही.आर.श्रीनिवास