बंद

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून ‘भादली’त 25 हजार युनिट सौर वीज निर्मिती !

प्रकाशन दिनांक : 02/06/2022

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची ‘भादली’च्या 32 एकरवरील सौर ऊर्जा प्रकल्पास भेट

  • ‘भादली’ला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही
  • महावितरणच्या कार्याचे केले कौतुक

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : वैजापूर तालुक्यातील भादली गावात मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने अंतर्गत महावितरणने 32 एकरावरील उभारलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज भेट दिली. या प्रकल्पाच्या निर्मितीबद्दल महावितरणच्या कार्याचे कौतुकही चव्हाण यांनी केले.

भादलीच्या या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात दिवसाला 25 हजार युनिट सौर ऊर्जा तयार होत असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी सांगितले. भादलीतील ग्रामस्थांनी महावितरणचे थकबाकी असलेली देयके त्वरित भरावीत. शेतकऱ्यांनी शेतीसाठी घेतलेल्या विजेची सद्यस्थितीतील देयकेही भरावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी ग्रामस्थांना केले. गावात सिंगल फेज वीज मिळण्याची व्यवस्था तत्काळ करावी. तसेच गावात येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी ग्रामस्थांनी विविध विषयांवर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. या भेटी दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, भादलीचे उपसरपंच अमोल सोनवणे, प्लांटचे जिल्हा प्रभारी रोहित हेमके, महावितरणचे दत्तात्रय फुंडे, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

तहसीलच्या स्थलांतरित जागेची पाहणी

वैजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या नियोजित स्थलांतरित जागा असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पाहणी केली. याठिकाणी जुन्या व चांगल्या अवस्थेत असलेल्या साहित्यास आहे तसेच ठेऊन तहसील कार्यालय उभारण्यात यावे. ही कार्यवाही लवकर पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विश्रामगृह अद्यावत करा

वैजापूर विश्रामगृह येथे भेट देत विश्रामगृह अद्यावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. येथील स्वच्छता गृहे तत्काळ दुरुस्त करावीत, व्हीआयपी कक्ष अधिक सुविधांयुक्त असावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांना चांगल्या सुविधा वेळेत द्या

जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वैजापूर तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी काही कर्मचाऱ्यांची दप्तर तपासणी केली. तसेच नागरिकांना सेवा वेळेत देण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्या. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गव्हाणे, उपविभागीय अधिकारी आहेर, तहसीलदार गायकवाड, तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेतून ‘भादली’त 25 हजार युनिट सौर वीज निर्मिती