बंद

मिशन बिगेन अगेन फेज पाच अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

प्रकाशन दिनांक : 10/07/2020

कंटेन्‍मेंट झोन बाहेरील हॉटेल्स, अतिथीगृहे, लॉजेस, उपहारगृहांना अटीं व शर्तींच्या अधीन परवानगी

मिशन बिगेन अगेन फेज पाच अंतर्गत जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

औरंगाबाद, दि.8 (जिमाका):- राज्य शासनाने दि. 8 जुलै 2020 पासून मिशन बिगेन अगेन फेज पाच लागू करून हॉटेल्स, अतिथीगृहे, लॉजेस, उपहारगृहे आदी अटी व शर्तीच्‍या अधीन राहून चालु करण्‍यास परवानगी दिलेली आहे.
त्यानुसार औरंगाबाद जिल्‍हयात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी मिशन बिगेन अगेन फेज पाच मधील मार्गदर्शक तत्‍वानुसार कंटेन्‍मेंट झोन बाहेरील हॉटेल्स, अतिथीगृहे, लॉजेस, उपहारगृहे तसेच रहिवासाची सुविधा पुरवणा-या इतर आस्‍थापना या मर्यादीत प्रवेशाच्‍या अटीवर चालू ठेवण्याचे परवानगी आदेश जारी केले आहेत. सदरील आस्‍थापना या 33 % क्षमतेसह आणि परिशिष्‍ट -1 मध्‍ये नमुद केलेल्‍या अटी व शर्तीवर चालु राहतील.
जर सदरील आस्‍थपना या क्‍वारंटाईन सुविधेसाठी यापूर्वी वापरण्‍यात येत असतील तर यापुढेही जिल्‍हा प्रशासनाने / महानगरपालिका प्रशासनाने तशी परवानगी दिली नसल्‍यास क्‍वारंटाईन सुविधेसाठी वापरल्‍या जातील. त्‍याचप्रमाणे सदरील आस्‍थापनांचा उर्वरित काही भाग किंवा शिल्‍लक असलेला 67% भाग क्‍वारंटाईन सुविधेसाठी जिल्‍हा प्रशासनाकडून वापरला जाऊ शकतो.
या आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती,संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्‍द कुठल्‍याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

परिशिष्‍ट- 1
(MISSION BEGIN AGAIN Phase V )
रहिवासाची सेवा पुरविणा-या हॉटेल्‍स, लॉजेस,अतिथीगृहे व इतर आस्‍थापनांसाठी अटी –
सर्व आस्‍थापनांनी खालील अतिरिक्‍त व्‍यवस्‍था दिल्‍याबाबत खात्री करावी.
दर्शनी भागात भित्‍ती पत्रके/स्‍टॅंडीज/दुरदर्शन संच आदींच्‍या माध्‍यमातून कोव्हिड-19 प्रतिबंधक उपाययोजना आणि त्‍याबाबतचे मार्गदर्शक तत्‍वे ठळकपणे लावावे.
हॉटेल मधील तसेच हॉटेलच्‍या बाहेरील परिसरात जसे की, पार्कींग एरिया यामध्‍ये गर्दीचे योग्‍य व्‍यवस्‍थापन करावे. रांगेचे व बैठक व्‍यवस्‍थेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी विशिष्‍ठ खुणा चिन्‍हांकित कराव्‍यात जेणेकरुन सामाजिक अंतराचे पालन होईल.
हॉटेल्‍स, लॉजेस व अति‍थीगृहेच्‍या प्रवेशव्‍दाराचे भागात थर्मल स्क्रिनिंगची व्‍यवस्‍था व स्‍वागतकक्षातील टेबलवर/जागेत संरक्षणात्‍मक काच लावणे आवश्‍यक राहील.
स्‍वागतकक्ष, अतिथीगृहातील कक्ष (खोली) सामाईक वापरातील भाग जसे की, लॉबी आदींमध्‍ये पायाने वापरता येणा-या यंत्रासह हॅंड सॅनिटाईजरची सुविधा मोफत उपलब्‍ध करुन द्यावी.
वैयक्तिक संरक्षणासाठी आवश्‍यक असलेले फेस शिल्‍ड/ मास्‍क, ग्‍लोव्‍हज इ. साहित्‍य हॉटेल मधील कर्मचार्‍यांना तसेच अतिथींना उपलब्ध करुन देण्यात यावे.
हॉटेल आस्‍थापना मध्‍ये कॉन्टॅक्टलेस प्रक्रियेची सुविधा जसे की, क्यूआर कोड,ऑनलाइन फॉर्म, ई-वॉलेट इत्‍यादी सारख्या डिजिटल पेमेन्टची सुविधांचा वापर केला पाहिजेत.
लिफ्टमधील अतिथींची संख्या नियंत्रित करावी व लिफ्ट मध्‍ये सामाजिक अंतराचे नियमाचे पालन करावे.
वातानुकूलन / वेंटिलेशनसाठी, CPWD च्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले जाईल ज्यामध्ये सर्व वातानुकूलन उपकरणांचे तपमान 24-30 डिग्री सेल्सियस पर्यंत असणे आवश्यक आहे. सापेक्ष आर्द्रता 40-70 %, च्या श्रेणीत असावी. ताजी हवा जास्‍तीत जास्‍त खेळती राहील आणि पुरेसे क्रॉस वेंटिलेशन असावे.
*अतिथी* –
केवळ लक्षणे नसलेल्‍या अतिथींनाच परवानगी राहील.
फेस शिल्‍ड/मास्‍क वापरणा-या अतिथींनाच प्रवेश देण्‍यात येईल.हॉटेल मध्‍ये वास्‍तव्‍य असलेल्‍या काळात पुर्णवेळ फेस शिल्‍ड/मास्‍क वापरणे आवश्‍यक राहील.
अतिथींचा तपशील (प्रवासाचा इतिहास, वैद्यकिय परिस्थिती इ.) तसेच ओळखपत्र, स्‍वंय घोषणापत्र स्‍वागत कक्षात उपलब्‍ध करुन देणे बंधनकारक राहील.
अति‍थींनी आरोग्‍य सेतू अॅप चा वापर करणे बंधनकारक राहील. हॉटेल मधील कर्मचा-यांचे सेवांचा कमीत कमी वापर करणेबाबत अतिथींना प्रोत्‍साहित करावे.
सुविधांचा उपयोग.
उपहारगृहांसाठी दिलेल्‍या सविस्‍तर मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. बसण्‍याच्‍या सुविधांचे पुर्ननियोजन करावे जेणेकरुन सामाजिक अंतराचे पालन होईल.
ई-मेनु आणि एकदा वापरुन टाकून देता येणा-या (Disposable)पेपर नॅपकिनचा वापर करण्‍यास प्रोत्‍साहन द्यावे. टेबलावर बसुन खाद्यपदार्थ खाण्‍याऐवजी रुम सर्व्हिस किंवा पार्सल स्‍वरुपात खाद्यपदार्थ घेवून जाण्‍यास प्रोत्‍साहन द्यावे. हॉटेल मध्‍ये वास्‍तव्‍यास असणा-या अतिथींसाठीच उपहारगृहे उपलब्‍ध राहतील. खेळाचे विभाग/लहान मुलांचे खेळण्‍याची जागा/जलतरण तलाव/व्‍यायाम शाळा बंद राहतील. मोठे संमेलने/परिषदा आदी हॉटेलच्‍या आवारात घेता येणार नाही. तथापी, बैठक कक्ष 33% क्षमतेने किंवा जास्‍तीत जास्‍त 15 व्‍यक्‍तींसाठी वापरता येईल.
स्‍वच्‍छता आणि निर्जंतुकीकरण –
अतिथींनी खोली रिकामी केल्‍यानंतर संबंधीत खोली आणि इतर सामाईक भागाचे प्रत्‍येकवेळी निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक राहील. प्रत्‍येक ग्राहकाने खोली रिकामी केल्‍यानंतर संबंधीत खोली 24 तास रिकामी ठेवावी. खोलीतील सर्व कपडे टॉवेल इत्‍यादी प्रत्‍येक ग्राहकानंतर बदलावे. हॉटेल मधील आवारात प्रभावी आणि वारंवार स्वच्छतेची व्यवस्था शौचालय, पाणी पिण्‍याचे ठिकाणे आणि हात धुण्यासाठीच्‍या जागेवर विशेष लक्ष केंद्रित करुन निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक राहील.
सर्व अतिथी सेवा क्षेत्र आणि सामान्य भागात वारंवार हात लागणारे ठिकाणांची (दरवाजाचे हॅंडल, लिफ्टची बटणे, बेंच, प्रसाधनगृहातील नळ इ.) साफसफाई आणि नियमित निर्जंतुकीकरण (1% सोडियम हायपोक्लोराइटने) करणे अनिवार्य राहील. नियमित अंतराने सर्व प्रसाधनगृहाची सखोल सफाई केली जाईल याची दक्षता घ्‍यावी.
अतिथींनी अथवा कर्मचार्‍यांनी वापरलेले फेस शिल्‍ड / मास्क / ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावण्‍याची दक्षता घ्‍यावी.
आवारात संशयित किंवा पुष्टी झालेल्या प्रकरणात आवश्यक कारवाई. आजारी व्‍यक्‍तींचे इतर व्‍यक्‍तींच्‍या संपर्कात येणार नाही अशा खोलीत अलगीकरण करावे.
तात्‍काळ नजीकच्‍या आरोग्‍य यंत्रणेशी (रुग्‍णालय/क्लिनिक) संपर्क करावा अथवा राज्‍य / जिल्‍हयाच्‍या हेल्‍पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. सार्वजनिक आरोग्‍य सेवेतील प्राधिकृत केलेला अधिकारी/ डॉक्‍टर धोक्‍याच्‍या पातळीचे मुल्‍यमापन करुन रुग्णाच्‍या आरोग्‍याचे दृष्‍टीने तसेच त्‍याच्‍या संपर्कातील व्‍यक्‍तींच्‍या आरोग्‍याचे दृष्‍टीने पुढील योग्‍य ती कार्यवाही करतील. जर व्‍यक्‍ती पॉझीटिव्‍ह आढळून आला तर संपुर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.