बंद

मिपा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या शुभेच्छा

प्रकाशन दिनांक : 24/12/2020

औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : निपुण स्मरणिकेतील सर्वच भाग वाचनीय आहे. यातून संस्था सर्वापर्यंत पोहचणार आहे. LEAD या ऑनलाईन कार्यक्रमातून अधिकाऱ्यांचे सक्षमीकरण होण्यास निश्चितच मदत होईल. अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक वृध्दीची संधी व त्यातून शालेय शिक्षणाचा विकास व्हावा. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी हा कोर्स करावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मिपा संस्थेस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा)च्या रौप्यमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त निपुण स्मरणिका ई-प्रकाशन व LEAD या अधिकाऱ्यांच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याहस्ते नुकतेच पार पडले, यावेळी श्रीमती गायकवाड बोलत होत्या.

      शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी विविध आव्हानात्मक क्षेत्रात शालेय नेतृत्त्वास आकार देण्याचे कार्य संस्था करत आहे. याबाबत समाधान व्यक्त करुन महाराष्ट्रातील इतर अनेक शैक्षणिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक नियोजन संस्थेमार्फत व्हावे, अशी अपेक्षा शुभेच्छा संदेशातून केली. निपा संस्थेचे कुलगुरू प्रो.एन.व्ही.वर्गीस, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणचे संचालक राहुल द्विवेदी, CISCO India & SAARC चे संचालक हरिश कृष्णन यांनी संस्थेचे अभिनंदन करत संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण आयुक्त तथा महासंचालक विशाल सोळंकी यांनी अध्यक्षीय भाषणात मिपा संस्थेचे नूतनीकरण झालेले आहे. यशदाप्रमाणे मिपा ही शिक्षण विभागासाठी प्रशिक्षण देणारी उत्कृष्ट संस्था म्हणून नावारुपास यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संस्थेच्या संचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ज्योती कुलकर्णी यांनी केले.