बंद

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेतून कोविडबाबत जनप्रबोधन करणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 10/09/2020

औरंगाबाद,दि. 10 (जिमाका) – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देशित केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात व्यापक स्वरूपात लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून या मोहिमेव्दारा कोविड-19 च्या संसर्गापासून बचाव करण्याच्या प्रतिबंधात्मक बाबींबाबत व्यापक जनप्रबोधन करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना आज सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’या मोहिमेच्या अंमलबजावणीबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे डॉ. विजयकुमार वाघ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख विवेक क्षिरसागर, प्रा. प्रशांत पाठक, सीएमआयचे अजय कुलकर्णी, कमलेश धुत, एस.झेड जाजू, डॉ. शिवाजी भोसले यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यावेळी म्हणाले, प्राथमिक स्तरावरच कोरोना संशयित रूग्ण शोधून त्यावर वेळेत योग्य उपचार करून कोरोना आजारातून जीवीत संरक्षण करणे शक्य आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून नागरिकांना कोरोना मुक्तीच्या प्रयत्नात सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ही मोहिम सहाय्यक ठरणारी आहे. जिल्ह्यात या मोहिमेचा पहिला टप्पा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर असा असणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य विषयक चौकशी केली जाणार आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात 50 घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा वर्कर आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. सर्वांच्या सहभागाने या मोहिमेतून नागरिकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य विषयक माहिती संकलन तसेच लोकांच्या सवयीमध्ये योग्य ते बदल करून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, स्वच्छता, कोणताही आजार अंगावर न काढता तातडीने योग्य वैद्यकीय सल्ला घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून या लोकप्रबोधन, जनशिक्षण आणि जनजागृतीव्दारे कोरोना आजार हा वेळीच निदान करून योग्य उपचाराने बरा होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये वाढण्यास मदत होईल, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, ही मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामार्फत राबविण्यात येणार असून यामध्ये स्वयंसेवी संस्था आणि जिल्ह्यातील उद्योजकांनीही सक्रीय सहभाग नोंदवत ही मोहिम अधिक यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेतून कोविडबाबत जनप्रबोधन करणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण