माजी सैनिकांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या समर्पित भावनेने सोडवाव्यात – अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे
प्रकाशन दिनांक : 30/09/2020
औरंगाबाद, दिनांक 29, (जिमाका) – देश सेवेकरिता जिवाची पर्वा न करता विरमरण पत्करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या प्रशासनाने समर्पित भावनेने सोडवल्यास त्यांच्या सेवेची संधी आपल्याला मिळून त्यांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येईल, अशा भावना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी आज येथे व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित शौर्य दिनानिमित्त वीरपत्नी, माता, पिता, सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त (शहर) मीना मकवाना, जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीर पिता, माजी सैनिक आदींची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्यात आले.
शौर्य दिवस हा एकच दिवस न साजरा करता 365 दिवस हा दिवस साजरा करायला हवा, कारण सिमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो, असे सांगून श्री.गव्हाणे म्हणाले की, सैनिकांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. जेव्हा जेव्हा देशावर कठीण प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा या कठीण प्रसंगातून सैन्यदलाने देशाला बाहेर काढले आहे आणि म्हणूनच माजी सैनिक अथवा त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रशासनाने समर्पित भावनेने समस्या सोडल्यास सैनिकांच्या ऋणातून उताई होण्याची संधी आपल्याला मिळेल.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी एस.विरासत म्हणाल्या की, पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याकरिता भारतीय सैन्याने आपल्या जीवाची पर्वा न करता अवघ्या अकरा दिवसामध्येच पाकिस्तान हद्दीमध्ये घुसून तारीख 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक करुन त्यांच्या द्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध अतिरेकी संघटनांचा खात्मा खुप मोठ्या प्रमाणात केला. त्यामध्ये भारतीय सैन्याच्या तीन ते चार तुकड्या कार्यरत होत्या व प्रत्येक तुकडीमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी सैनिकांनी भाग घेतला होता. भारतीय सैन्याची ही अभिमानास्प्द कामगिरी राज्यातील सर्व जनतेपर्यंत व्यापक प्रसिध्दीद्वारे पोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चित केले आहे. या शौर्य दिनाच्या प्रसंगी सैनिकांप्रती असलेली आदराची भावना समाजातील सर्व लोकांपर्यत पोहचविण्याच्या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येतो.
आपल्या देशाच्या बहुमोल स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणारा व कोणत्याही अडचणींची पर्वा न करता आपली कर्तव्ये चोखपणे बजावणारा देशाचा बहादूर सैनिक हा आपल्या सर्वांच्या आदराचा आणि अभिमानाचा विषय आहे.
प्रारंभी देशाचे संरक्षण करत असतांना आपल्या जिल्ह्यातील 19 जवान शहीद झाले, त्यांच्या वीरपत्नी कमल गायकवाड, वीरमाता शिला दांडगे, वीरपत्नी कांता पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबर कोरोना काळात महानगर पालिका सैनिक मित्र पथकाच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.
