महिलांनी आर्थिकदृष्टया स्वावलंबी व सक्षम व्हावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 09/03/2022
औरंगाबाद, दि. 08 (जिमाका) : महिलांनी आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवण्याबरोबरच आर्थिक दृष्टया स्वावलंबी व सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे, प्रत्येक महिलांनी कार्यरत असणाऱ्या क्षेत्रामध्ये उत्तम योगदान देण्याबरोबरच इतर महिलांनाही सहकार्य आणि प्रेरणा बनण्याचे प्रयत्न करावे असे आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, मुख्य अतिथी म्हणून ब्रिगेडिअर सुनील नारायण, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संगीता सानप, संगीता चव्हाण, अप्पासाहेब शिंदे, भारत कदम, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी.एल. राठोड यांच्यासह विविध क्षेत्रातील सन्मानित करण्यात आलेल्या महिला व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सैन्य दलामध्ये महिलांचे कर्तृत्व महत्त्वपूर्ण असून त्यांची परिचारिका ते भारतीय सैन्य दलातील लढाऊ विमान चालवण्याची संधी उपलब्ध आहे. या संधीचा उपयोग देशाच्या संरक्षणाबरोबरच भारत देशासाठी अभिमानस्पद आहे असे ब्रिगेडिअर सुनील नारायण यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.
प्रत्येक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना प्रेरणा व उर्जा देण्यासाठी त्यांच्या कार्यकतृवाची नोंद विविध कार्यक्रमातून घेण्यात येत आहे. समाजामध्ये बदल घडविणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांनी सहकार्य आणि संघ भावनेतून काम करावे, तसेच महिला या उत्तम व्यवस्थापक असून कुटुंब, समाजकारण, राजकारण, प्रशासन यामध्ये आपल्या कौशल्याचा वापर करुन सर्वोच्च योगदान देत असतात. हे योगदान प्रत्येकाला स्वावलंबी, आर्थिक दृष्टया सक्षम बनण्यासाठी उपयुक्त ठरावे असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या महसूल कर्मचारी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये रुपाली कुलकर्णी, पार्वती फुंदे, सुकेशनी जाधव, सुरेखा शहा, प्रतिमा भांड, पुजा ठोंबरे, श्रीमती उमाप, जयश्री आखरे यांच्यासह अन्य महिलांचा समावेश होता.