बंद

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

प्रकाशन दिनांक : 01/03/2021

·  प्रत्येकाने मराठीचा आग्रहपुर्वक वापर करण्याचे आवाहन  

औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मराठी ही फक्त भाषा नसून जीवन पद्धती झाली आहे. या भाषेला एक अमुल्य वारसा आहे. अशा या वैभवशाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शासन पुर्णपणे प्रयत्नशील असल्याचे सांगून मराठीचा प्रसार, प्रचार वृद्धींगत करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने मराठीचा आग्रहपुर्वक वापर करण्याचे आवाहन उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज येथे केले.

 ज्येष्ठ साहित्यिक तथा कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा देतांना श्री. देसाई औरंगाबाद येथे बोलत होते. यावेळी श्री. देसाई यांनी नागरीकांना दररोजच्या व्यवहारात मराठी भाषा वापरण्याचे आवाहन करत 12 कोटी मराठी जनतेसह जगभरात मराठी भाषाप्रेमी आहेत. आपण सर्व मराठीच्या समृद्धीसाठी सक्षम असून मराठी भाषेला प्राचीन वारसा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात आला असून लवकरच याबाबत यश मिळेल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून विविध देशांमध्ये असलेल्या मराठी भाषिकांसाठी दुरस्थ पद्धतीने मराठी भाषा शिकल्या जात आहे. अशा या मराठी भाषेचा झेंडा जगभरात फडकत आहे. अशा अपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगत प्रत्येकाने संवाद साधताना, संदेश देतांना मराठी भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे, असे मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई आज येथे म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनूसार महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होण्यासाठी संबंधित संस्थांना सूचीत करण्याबाबत केंद्र सरकारला मुख्यमंत्र्यांनी लेखी पत्र दिले असुन लवकरच त्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे. तसेच समाज माध्यमे, मोबाईलवरील संदेशवहनासाठी, मराठीतून ॲप्स, ॲमेझॉन, फ्लीपकार्ट सारख्या व्यापारविषयक ॲपही मराठीतून तयार केल्याने तंत्रज्ञानाच्या युगात मराठी वेगाने प्रसारीत होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिनांक 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिनातिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना तसेच श्री. रंगनाथ पठारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यासोबतच दोन संस्थांनाही गौरवण्यात येणार असून यामध्ये आंध्र प्रदेश येथील मराठी साहित्य परिषद तसेच शब्दालय प्रकाशन संस्था, अहमदनगर   यांचा समावेश असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.