मराठवाडामुक्ती संग्रामाच्या स्मृती जतनसाठी स्मृती स्तंभ, स्मृती स्मारकांचे संकल्प चित्र पाठवण्याचे आवाहन
प्रकाशन दिनांक : 21/06/2022
औरंगाबाद, दि.20 (विमाका) :- मराठवाडामुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष येत्या 17 सप्टेंबर, 2022 रोजी होत आहे. त्या निमित्ताने स्मृती जतन करण्याकरीता वास्तुविशारद, इतिहास प्रेमी, कलाकार, विद्यार्थी व जनतेने स्मृतीस्तंभाचे आणि स्मृतीस्मारकांचे संकल्पचित्र विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासन शाखा येथे 30 जून, 2022 पर्यंत पोस्टाद्वारे किंवा सक्षम पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत अमृत महोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आयोजित करुन साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळ उपसमिती गठीत केली आहे. मंत्रीमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मराठवाडामुक्ती संग्रामाच्या स्मृती जतन करणे, पुढील पिढीला त्याची माहिती होण्यासाठी व त्यापासून प्रेरणा घेण्यासाठी ज्याठिकणी मुक्ती संग्रामाशी संबंधीत ठळक घटना घडल्या अशा महत्वाच्या निवडक ऐतिहासिक ठिाकाणी दगडी स्तृतीस्तंभ उभारणे प्रस्तावित आहे. तसेच सर्व जिल्हा मुख्यालयी स्मृती स्मारक उभारणे प्रस्तावित आहे.
अशा स्मृतीस्तंभांचे आणि स्मृती स्मारकांचे संकल्पचित्र विविध वास्तुविशारद, इतिहास प्रेमी, कलाकार, विद्यार्थी व जनता यांचेकडून खालील बाबी विचारात घेवून मागविण्यात येत आहेत. यासाठी कोणतीही प्रवेश फि नसून असे संकल्पचित्र सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे पोष्टाव्दारे अथवा समक्ष पाठविण्यात याव्यात. संकल्पचित्र बनविण्यासाठी शासनाकडून कोणताही निधी / अनुदान / खर्च अदा करण्यात येणार नाही. प्राप्त झालेल्या संकल्पचित्रांपैकी निवडलेल्या संकल्पचित्रास पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
स्मृती स्तंभ व स्मृती स्मारकाचे संकल्पचित्र हे शक्यतो स्थानिक रित्या मराठवाड्यात उपलब्ध होणा-या दगडापासून तसेच साहित्यापासून बनविणे अपेक्षीत असून मराठवाड्याची ओळख यातून प्रदर्शीत होणे अपेक्षीत आहे. स्मृती स्तंभाचे हा साधारणतः १५ फुट उंच व सुमारे १०० चौरस फुट जागेवर उभारावयाचे आहे. त्यानुसार स्मृती स्तंभाचे संकल्प चित्र देण्यात यावे. तर स्मृती स्मारक साधारणतः २५ फुट उंच व सुमारे ४०० ते ५०० चौरस फुट जागेवर उभारावयाचे आहे. अशा स्मारकाचे संरक्षण व दीर्घ कालावधीसाठी जतन होणे देखील अपेक्षीत असून यासाठी स्मारक आणि स्तंभा भोवती संरक्षक भिंत करणे अपेक्षीत आहे. त्यानुसार स्मृती स्तंभ व स्मृती स्मारकाचे संकल्प चित्र सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, दिल्ली गेट जवळ, औरंगाबाद – ४३१००१ येथे देण्यात यावे असे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.