बंद

मत कसे नोंदवावे याबाबत जिल्हाधिकारी यांच्या सूचना

प्रकाशन दिनांक : 30/11/2020

औरंगाबाद ,दि.29 (जिमाका):- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेसाठी व्दिवार्षिक निवडणूक 2020 करीता मत कसे नोंदवावे याबाबत मतदारांसाठी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत पुढील सूचना केलेल्या आहेत. 

मतदान करण्‍यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतपत्रिकेसोबत पुरविलेला जांभळ्या रंगाचा स्‍केचपेनचाच वापर करावा. याशिवाय तुमची मतपत्रिका अवैध ठरेल असे इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंन्‍ट पेन किंवा इतर चिन्हांकीत करावयाची साधने वापर नयेत, पसंतीक्रम (Order of Preference)  या स्तंभामध्ये ज्यास तुम्ही पहिला पसंतीक्रम देण्‍यासाठी निवडले आहे, त्‍या उमेदवाराच्‍या नावासमोर “1” हा अंक नमूद करुन त्यास मतदान करता येइल . “1” हा अंक केवळ एका उमेदवाराच्या नावासमोर नमुद करता येईल, जरी निवडून द्यावयाच्‍या उमेदवारांची संख्‍या एका पेक्षा जास्‍त असेल तरी “1” हा अंक केवळ एकाच उमेदवाराच्‍या नावासमोर नमूद करता येईल, निवडून द्यावयाच्‍या उमेदवारांच्या संख्येव्यतिरिक्त तुम्हाला जेवढे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत, तेवढे पसंतीक्रम नोंदविता येतील. उदा. उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तेवढे  पसंतीक्रम नोंदविता येतील, उर्वरित उमेदवारांच्‍या नावासमोर तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 इत्‍यादी अंक तुमच्‍या पसंतीक्रमानुसार “पसंतीक्रम” (Order of Preference) या स्‍तंभामध्‍ये दर्शवा, कोणत्‍याही उमेदवारांच्या नावासमोर केवळ एकच अंक नमूद करावा. एकच अंक एका पेक्षा जास्‍त उमेदवारांच्‍या नावा समोर नमुद करू नये, पसंतीक्रम हा केवळ अंकात दर्शविला जाईल. उदा. 1,2,3, इत्यादी आणि तो एक, दोन, तीन, इत्यादी असा शब्दात दर्शवू नये, अंक हे भारतीय आंतरराष्‍ट्रीय अंक स्‍वरुपात जसे 1,2,3, इत्यादी किंवा रोमन स्‍वरुपातील I,II,III, इत्यादी किंवा संविधानाच्या 8 व्या अनुसुचितील भारतीय भाषेतील अंकाच्‍या स्‍वरुपात नोंदविता येतील, मतपत्रिकेवर तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे किंवा नाव किंवा कोणतेही शब्द नमूद करू नये. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये, तुमचा पसंतीक्रम दर्शविण्‍यासाठी मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर  (ü) किंवा (X) अशी खुण करू नये. अशी मतपत्रिका बाद ठरेल, तुमची मतपत्रिका वैध ठरण्‍यासाठी उमेदवारांपैकी एकाच्‍या नावासमोर “1” हा अंक नमूद करून तुमचा पहिला पसंतीक्रम दर्शविणे आवश्‍यक आहे. इतर पसंतीक्रम हे ऐच्छिक स्‍वरुपाचे असून ते अनिवार्य नाहीत, असेही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.