बंद

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे-जिल्हाधिकारी उदय चौधरी चित्ररथ व पथनाट्याद्वारे जिल्हाभरात होणार मतदान जनजागृती

प्रकाशन दिनांक : 20/04/2019

औरंगाबाद, दिनांक १७ (जिमाका)- नव मतदारांना नुसते नाव नोंदवून भागणार नाही तर त्यांनी मतदान करणे अपेक्षित आहे. आणि आपल्याला जे मत द्यायचे आहे त्याच्यामध्ये कोणाच्याही दबावाला, प्रलोभनला बळी न पडता निर्भयपणे मत दिलं पाहिजे, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज सांगितले.

        भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या रिजनल आउटरिच ब्यूरो, पुणे व मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने महा मतदार जागृती अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे पश्चिम विभागाचे मिडिया हेड, आर एन मिश्रा, निवडणूक निरीक्षक, जे. के. चंदनानी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पवनित कौर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, पोलीस उपायुक्त, राहुल खाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसाद मिरकले, आकाशवाणी, औरंगाबादचे सहा. संचालक, रमेश जयभाए, फिल्ड आउटरिच ब्यूरो, औरंगाबादचे सहा. संचालक, निखिल देशमुख, प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात १ कोटी १९ लाख नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे आणि या नविन मतदारांना आपण मतदानाच्या या महापर्वात मतदानासाठी प्रवृत्त करावयाचे आहे. असे आवाहन भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयाचे महासंचालक व पश्चिम क्षेत्राचे मिडिया हेड आर एन मिश्रा यांनी केले.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०१९ साठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमाद्वारे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दिनांक १८ ते २२ एप्रिल २०१९ दरम्यान महा मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये फिरते प्रदर्शन वाहन व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

*****

मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे -जिल्हाधिकारी उदय चौधरी