मतदान प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 19/11/2020
औरंगाबाद, दि.18 (जिमाका) :- मतदान प्रक्रिया नियमानुसार सुरळीत पार पाडण्यात सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यादृष्टीने सर्वांनी लक्षपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे सूक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी डॉ भारत कदम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक हा निवडणूक निरीक्षकाच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्रावर काम पाहत असतो. सर्व मतदान केंद्रावर सुरक्षीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अहवाल निवडणूक निरीक्षकांकडे सूक्ष्म निरीक्षक यांनी सादर करावयाचा आहे, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, दि. 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सर्व मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. या निवडणूकीत मतपेट्यांचा वापर करण्यात येणार असून मतपत्रिकांद्वारे मतदान होणार आहे. मतदारांना जांभळ्या शाईचे पेन मतदान केंद्रावर उपलब्ध राहणार असून त्याचा वापर करून मतदारांनी पसंती क्रम देऊन मतदान करायचे आहे. मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक यांनी या सर्व प्रक्रियेवर लक्ष द्यायचे असून जर मतदान केंद्रावर तसेच मतदान प्रक्रियेत काही नियम बाह्य बाबी आढळून आल्या तर त्याबाबत मतदान केंद्र अधिकारी, तहसिलदार यांना त्याबाबत अवगत करावे तसेच आवश्यकतेनुसार निरीक्षकास कळवायचे आहे. प्रामुख्याने मतदान केंद्रांवर उमेदवार प्रतिनिधी, मतदान अधिकारी, केंद्र सहायक, मतदार सर्व नियम पाळतात का यावर लक्ष द्यायचं आहे, असे सांगून श्री. चव्हाण यांनी मतदान केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आपल्याला पार पाडावयाच्या जबाबदारी बाबत संबंधितांनी सर्व नियम माहिती करून घ्यावे. तसेच प्रशासनाने कोविड पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेतली असून संपूर्ण प्रक्रियेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी मतदान प्रक्रियेची गोपनियता जपणे आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानूसार योग्य पद्धतीने मतदारांची ओळख पटवणे, मतदान केंद्रावरील प्रवेश पास व्यवस्था, मतदाराच्या बोटावर शाई व्यवस्थित लावल्या जात आहे का? या सर्व बाबींवर सूक्ष्म निरीक्षक यांनी बारकाईने लक्ष ठेवणे. तसेच कोणत्याही प्रकारे नियमबाह्य गोष्टी मतदान केंद्रावर घडत नाही याबाबत दक्ष राहून यासह आयोगाने निर्देशित केलेल्या सर्व बाबींवर लक्ष देण्याची जबाबदारी सूक्ष्म निरीक्षक यांना पार पाडावयाची आहे. श्री. गव्हाणे यांनी सूक्ष्म निरीक्षक यांची जबाबदारी, भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी कोविड संसर्गाच्या पाश्वभूमिवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह घ्यावयाची खबरदारी, मतदान प्रक्रियेतील कामांबाबत यावेळी माहिती दिली.
