बंद

मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल

प्रकाशन दिनांक : 25/04/2019

औरंगाबाद, दि.23 (जिमाका) : लोकसभा निवडणूक अनुषंगाने आज झालेल्या मतदानाप्रसंगी एका अज्ञात व्यक्तीने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण करुन ते टिकटॉक या मोबाईल ॲप्लीकेशनच्या आधारे सोशल मीडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलीस विभागाने सदर अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात नियुक्त नायब तहसीलदार सिध्दार्थ धनजकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी तक्रारीत नमूद केले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक सेलला ए.बी.पी. माझा या न्यूज चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या बातमीत एका अज्ञात व्यक्तीने टिकटॉक या मोबाईल ॲप्लीकेशनच्या आधारे मतदान कक्षामध्ये ईव्हीएम मशीनचे व मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केल्याचे दिसून आले. या व्यक्तीने प्रत्यक्ष मतदान करतानाच एक संगीतमय व्हिडीओ तयार करुन तो टिकटॉक या सोशल साईटवर अपलोड करुन व्हायरल  केला.

मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असतानाही सदर अज्ञात व्यक्तीने मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करुन ते व्हायरल केल्याप्रकरणी नायब तहसीलदार सिध्दार्थ धनजकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द भा.द.वी. चे कलम 188, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 (2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2009 चे कलत 43 (ए), R/w-66, 70, 72 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*****