बंद

भूजल अधिनियमानुसार 30 गावांतील 72 उद्भव जाहीर

प्रकाशन दिनांक : 12/02/2021

औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका):  मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. औरंगाबाद यांचेकडून प्राप्त सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे गतवर्षी निर्माण करण्यात आलेल्या स्त्रोत जाहीर प्रगटन काढून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्यावर कोणाचेही काही आक्षेप, सूचना अथवा हरकती प्राप्त झालेले नाहीत. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 ची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जाहीर प्रगटनाव्दारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्ह्यातील 30 गावांतील 72 उद्भव नवीन विंधन विहीर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत असल्याचे महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 चे कलम 20 नुसार या आदेशान्वये जाहीर करत असल्याचे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशात नमुद आहे.‍ 

महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 चे कलम 20 नुसार पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित होण्याच्या दृष्टीकोनातून सदर स्त्रोतापासून 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाशिवाय अन्य कारणांसाठी स्त्रोत निर्माण करण्यास अथवा सदर सार्वजनिक स्त्रोतामधून पिण्याच्या पाण्याशिवाय पाणी उपसण्यास या आदेशान्वये प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर आदेशाचा भंग केल्यास भूजल अधिनियमातील कलम-17 अन्वये जिल्हा प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी संबंधिताविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.औरंगाबाद, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा जि.प.औरंगाबाद व संबंधित गट विकास अधिकारी यांनी वेळोवेळी महाराष्ट्र भूजलअधिनियमातील कलमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहे.