बालमजुरीचे निर्मुलन करुन बालपण फुलू द्यावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 19/06/2022
औरंगाबाद, दिनांक 18 (जिमाका) : समाजात बालकामगार प्रथेचे निर्मुलन करुन मुलांना शिक्षण देऊन त्यांचे बालपण फुलविणे आवश्यक आहे. यासाठी माहिला व बालकल्याण तसेच चाईल्ड लाईनच्या संबंधित यंत्रणांनी काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाल कामगार प्रतिबंध सप्ताहनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दिले. यावेळी जनजागृती करणाऱ्या आय.ई.सी. बलून व्हॅनला जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा देत मार्गस्थ केले.
यावेळी बालहक्क संरक्षण समितीच्या जिल्हा अध्यक्ष ॲङआशा शेरखाने, चाईल्ड लाईनचे प्रकल्प संचालक अप्पासाहेब झांबड, केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुख झाबंड, दामिनी पथकाच्या श्रीमती आशा गायकवाड त्याचप्रमाणे एल.जी.जाधव व इतर संबंधित कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 12 जून ते 20 जून 2022 या कालावधीत ‘बालकामगार निर्मुलन सप्ताह’ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात “बालमजुरीचा प्रतिबंध करुन बचपन बचाव” असा संदेश लिहून जिल्हाधिकारी यांनी स्वाक्षरी करीत या मोहिमेचे उद्घाटन केले. तसेच बालमजुरी संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून समाजात निर्दशानास येणाऱ्या बालमजुरीस प्रतिबंध करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. यानंतर उपस्थितांनी बालमजुरीस प्रतिबंध करणाऱ्या आशयाचे संदेश लिहून स्वाक्षऱ्या केल्या.
