बंद

बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या वाढवाव्यात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 09/03/2021

  • कोविड लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करावे
  • प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण उपयुक्त

औरंगाबाद, दि.08, (जिमाका) :- जिल्ह्यात संसर्गाचे प्रमाण वाढत असून ते वेळीच रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करावी त्यासोबतच बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या तातडीने अधिक प्रमाणात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना लसीरकण, कोरोना उपचार सुविधांच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दि. 11 मार्च पासून अंशत: लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून जिल्हाधिकारी यांनी रूग्ण वाढीच्या प्रमाणात सर्व ग्रामीण परिसरात कोरोना चाचण्या करण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे सांगून बाधीत रूगण ज्या-ज्या लोकांच्या संपर्कात आलेला असेल त्या सर्वांची विस्तृत माहिती घेऊन त्या सर्वांची तातडीने कोरोना चाचणी करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी दिले. जेणेकरून वाढता संसर्ग वेळीच रोखणे शक्य होईल. तसेच सर्व उपचार सुविधा मनुष्यबळ, पुरेशा खाटा, पूरक अत्यावश्यक बाबींसह सज्ज ठेवण्याचे तसेच सर्व उपचार सुविधामध्ये रूग्णांसाठी पूरेशी सुरक्षा, महिलांसाठी विशेष खबरदारीसह सुरक्षा व्यवस्था ठेवावी. सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा ठेवावी, असे निर्देशित करून जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा आढावा घेऊन श्री. चव्हाण यांनी सर्व यंत्रणांनी आपल्या अखत्यारितील फ्रंटलाईन वर्कर, आपल्या कर्मचाऱ्यांना लसीरकण करून घेण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याला संबंधित प्रमुखांनी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना कोरोना लसीकरणाचे फायदे आणि सुरक्षितता याबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांच्या लसीकरणासाठी सहाय्य करावे, असे निर्देशित करून श्री. चव्हाण यांनी सध्या आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांच्यासह लसीकरणाच्या पुढील टप्प्यात आता 45 ते 59 या वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या लोकांना तसेच ज्येष्ठ नागरीकांना लस देण्यात येत असून यासाठी कावीन ॲप, आरोग्य सेतू या ठिकाणी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष आरोग्य केंद्रावरही लस नोंदणी सेवा उपलब्ध आहे, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून नोंदणी वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे सूचित केले. तसेच शासकीय आरोग्य केंद्र, रूग्णालये येथे विनाशुल्क लस उपलब्ध असून खासगी रूग्णालयात 250 रू. प्रती व्यक्ती प्रती डोस लस उपलब्ध आहे. त्यामध्ये खासगी डॉक्टरांशी बोलुन सेवा शुल्क कमी करून 250 पेक्षा कमी शुल्कात लस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना लसीकरण उपयुक्त असून त्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

डॉ. गोंदावले यांनी ग्रामीण भागात संसर्ग रोखत असताना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे सूचीत केले.

जिल्ह्यात आतापर्यंत 48939 जणांचे कोरोना लसीकरण झाले असून 43 ठिकाणी शासकीय केंद्रावर निशुल्क लस उपलब करून देण्यात आलेली आहे. सध्या आरोग्य क्षेत्रातील तसेच फ्रंटलाइन वर्कर यासोबत ज्येष्ठ नागरीक, 45-59 वयोगटातील सहव्याधी असणाऱ्या लाकेांचे लसीकरण सुरू आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील 78 टक्के, फ्रंटलाइन वर्करचे 38 टक्के लसीकरण झाले असून लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती डॉ. पल्लवी पगडाल यांनी यावेळी दिली.

बाधितांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या वाढवाव्यात