बंद

प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 13/01/2021

औरंगाबाद, दिनांक, 12 (जिमाका): कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता आपण यशस्वी झालो आहोत. यात पुढचा टप्पा म्हणजे लसीकरण होय. तरी ही लसीकरणाची मोहिम प्रशासन आणि सर्व डॉक्टरांच्या समन्वयाने यशस्वी करुया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने कोविड-19 लसीकरण संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजाळकर, सचिव डॉ. यशवंत गाढे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता कदम, यांच्यासह फिजीशिअर असोसिएशन डॉक्टर तसेच शहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, गेल्या मार्च महिन्यापासून पासून आपण सर्वजण कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी लढत आहोत. कोरोना विषाणूच्या या संक्रमणास थोपवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. म्हणूनच आज जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के इतके झाले आहेत. यात जिल्ह्यातील सर्वच डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. आणि म्हणूनच या सर्वांना मी धन्यवाद देतो, असे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, आता आपल्याला लसीकरणाची ही मोहिम अशाच पध्दतीने यशस्वी करावयाची आहे. या करिता सर्व डॉक्टरांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. कोरोनाविरुध्दच्या या लढाईमध्ये सर्वांनी न घाबरता हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी कोविड-19 लसीकरण म्हणजे काय? लसीचे प्रकार, लस देताना घ्यावयाची काळजी, नोंदणी कशी करावी. ऑनलाईन प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदी संदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात