बंद

प्रवास, गर्दी टाळा, आवश्यकता असल्यासच नियमांचे पालन करत घराबाहेर पडा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन

प्रकाशन दिनांक : 29/10/2021

औरंगाबाद, दिनांक 29 (जिमाका) :  सणासुदीच्या काळाला प्रारंभ झालेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे.

            प्रवास करण्यामुळे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे औरंगाबाद शहरात 23 ते 27 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 27 रुग्ण आढळले. या कालावधीत मनपा क्षेत्रातील करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये शहरातील विविध भागातील 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. आढळलेल्या रुग्णांत 24 आरटीपीसीआर, 03 अँटिजेन प्रक्रियेत पॉ‍झिटिव्ह आढळले. या 27 रुग्णांपैकी 55 जण हाय रिस्क कॉटँक्टमध्ये असल्याने त्यांच्यापैकी 49 जणांनी चाचणी केली. त्यात 05 पाच पॉझिटिव्ह आढळले, तर सहा जणांनी चाचणी केलीच नाही.

            या रुग्णांबाबतचा सखोल अभ्यास केल्यानंतर नागरिकांनी प्रवास करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, कोविड नियमांचे पालन काळजीपूर्वक करावे, असे लक्षात आले.           आढळलेल्या 27 रुग्णांमध्ये 08 जणांनी बाहेरचा प्रवास केला. त्यात चार व्यक्ती बीड येथून प्रवास करून आलेल्या आहेत. तर पुणे, नगर, बुलडाणा याठिकाणाहून प्रवास केलेल्या प्रत्येकी एक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील साई येथे प्रवेशासाठी आलेला जळगावातील एक विद्यार्थी असे एकूण आठ रूग्णांनी प्रवास केल्याचे मनपाने केलेल्या अभ्यासात लक्षात आलेले आहे. तर फ्रंटलाइन वर्करमध्ये शहरातील एका शाळेतील एका शिक्षकास, तर फ्रंटलाइन वर्करच्या नातेवाईकांमध्ये सेव्हन हिल येथील सुरक्षा रक्षकाच्या आईस, एसटी विभागातील एका लिपिकाच्या पत्नीस, प्रोझोन मॉलमधील एका मुलास अशा चार जणांना; कम्युनिटी काँटॅक्ट प्रकाराअंतर्गत ट्युशनला गेलेल्या एका विद्यार्थ्यास, गुलमंडीवर खरेदीसाठी, दसऱ्यानिमित्त कर्णपुरा येथील मंदिरात गेलेल्या अशा तीन व्यक्तींनाही कोरोना झाला. 07 रूग्णांचा इतिहास जाणने शक्य झालेले नाही. तर 05 जणांनी चुकीचा पत्ता दिल्याने त्यांच्याशी  प्रशासनाला संपर्क साधता आलेला नाही. या अभ्यासा अंती असा निष्कर्ष निघतो, की अधिकांश रूग्ण गर्दीच्या ठिकाणी गेल्याने प्रवास केल्याने बाधित झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे  टाळावे, जर घराबाहेर जाणे खूपच महत्त्वाचे, अत्यावश्यक असल्यासच कोविड 19 नियमांचे पाल करावे. म्हणजेच वारंवार हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर पाळणे या बाबी कटाक्षाने पाळाव्यात. तसेच नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.