बंद

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना द्या – अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 08/12/2020

औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह शहरातील लाभार्थ्यांपर्यंत अधिकाधिक प्रमाणात पोहोचविण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या जिल्हास्तरीय सुकाणू व संनियंत्रण समितीची बैठक श्री. गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.व्ही.कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विजय वाघ, छावणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रांत मोरे, जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

श्री. गव्हाणे म्हणाले, जिल्ह्यातील माता मृत्यू दर रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी. नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. ही लोककल्याणकारी योजना असून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी. निश्चित केलेल्या उद्दिष्टांपेक्षा पुढे जाऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचनाही श्री. गव्हाणे यांनी केल्या.

माता व बालसंगोपन अधिकारी श्री. वाघ यांनी या योजनेबाबत सविस्तर सादरीकरणे केले. यावेळी श्री. शेळके यांनीही आरोग्य अधिकारी यांना सूचना केल्या.

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचाही घेतला आढावा

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या बैठकीनंतर श्री. गव्हाणे यांनी जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठकही घेतली. या बैठकीत डॉ. वाघ यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्ह्यातील नियोजनाबाबत माहिती सादर केली. त्यावर श्री. गव्हाणे यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यासाठी खासगी रूग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची तत्काळ माहिती प्रशासनास उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, वॉर्ड बॉय  व दवाखान्यात काम करणार सर्व कर्मचारी यांची माहिती जवळच्या शासकीय रूग्णालयात देण्यात यावी, असे आवाहन केले. पहिल्या टप्प्यात सर्व शासकीय व खासगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी , परिचारिका, सफाई कामगार, वॉर्ड बॉय  व दवाखान्यातील काम करणारे सर्व कर्मचारी आदींचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व अधिकारी, कर्मचारी यांची माहिती सीव्हीबीएमएस या डेटाबेसवरती भरावयाची आहे, तरी ही माहिती सर्व आरोग्य यंत्रणांनी तत्काळ प्रशासनास उपलब्ध करून द्यावी, असेही श्री. गव्हाणे म्हणाले. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे सादरीकरण श्री. वाघ यांनी केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना द्या