बंद

पोस्टाची घरपोच जीवन प्रमाण सुविधा सुरू

प्रकाशन दिनांक : 05/11/2020

औरंगाबाद, दि.5 (जिमाका) – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून भारतीय डाक विभागाने “घरपोच” जीवन प्रमाण (डिजिटल जीवन प्रमाणपत्र, हयातीचा दाखला) सुविधा सुरू केली आहे. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत पेन्शनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनर त्यांच्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधू शकतात, असे पोस्ट विभागाने कळविले आहे.

याशिवाय ‘postinfo’ ॲप डाउनलोड करून त्यामध्ये ‘Service Request’ हा पर्याय वापरून त्यांची जीवन प्रमाणसाठीची विनंती नोंदवू शकतात. या विनंतीप्रमाणे पोस्टमन पेन्शनरच्या घरी येऊन आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरणाव्दारे जीवन प्रमाण जारी करेल. पेन्शनचा प्रकार सर्विस पेन्शन, फॅमिली पेन्शन इ. पेन्शन कुठल्या विभागाची आहे याची माहिती, पेन्शन मिळणाऱ्या बँक, पोस्ट ऑफिसचे नाव, पेन्शन पेमेंट ऑर्डर (ppo) क्रमांक, पेन्शन ज्या बँक, पोस्ट ऑफिस खात्यात जमा होते तो खाते क्रमांक, मोबाईल नंबर, आधार क्रमांक या व्यतिरिक्त, निवृत्तीवेतनधारकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्याचा किंवा तिचा आधार क्रमांक पीपीओशी जोडला आहे आणि पेन्शन वितरण करणारी संस्था जीवन प्रमाण डिजिटल स्वरूपात स्वीकारत आहे. सदर सेवेसाठी शुल्क रू. 70/- प्रति जीवन प्रमाण (सर्व करांसहित) इतके आहे, असेही पोस्ट विभागाने कळविले आहे.