पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे
प्रकाशन दिनांक : 28/09/2020
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले. तसेच या पावसामुळे झालेल्या विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचे आवाहनही श्री. भुसे यांनी केले.
कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली. त्यांच्यासमवेत आमदार उदयसिंह राजपूत, कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती.
नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद श्री. भुसे यांनी साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
