बंद

पीक कर्जाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 27/07/2021

औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : पीक कर्जाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट जिल्ह्यातील बँकांनी पूर्ण करावे. पीक कर्जासाठी जुने- नवे कर्ज करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हास्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरीय आढावा समिती बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, महाराष्ट्र बँकेचे  क्षेत्रीय व्यवस्थापक अहिलाजी थोरात,  अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिगंबर महाडिक,  जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे श्री. शिंदे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे विश्वनाथ भोंबे, शिवाजी कासारकर आदींसह जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पीक कर्ज, मुख्यमंत्री रोजगार हमी कार्यक्रम, बचत गटांसाठी खाते उघडणे, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदींसह विविध विषयांचा बँकनिहाय आढावा घेतला. आढाव्यामध्ये बँकांना ठरवून दिलेले उद्दिष्ट, बँकांकडे असलेले प्रलंबित कर्ज प्रस्ताव आदींचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलेले नाही, अशा शेतकऱ्यांना ते तत्काळ देण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी केल्या.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीक कर्ज वाटपात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक श्री. चव्हाण यांनी केले. पीक कर्ज मिळविण्यासाठी अनेक नागरिकांना अडचणी येताहेत, त्या येऊ नयेत, यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. शेतीबरोबरच गरजू, युवक, उद्योजकांना स्वयं रोजगारांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. बैठकीस जिल्हा समन्वयकांनी अद्ययावत माहितीसह उपस्थितीत रहावे, असे आवाहनही श्री.चव्हाण यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केले. केंद्र व राज्य शासनाच्या बँकेशी निगडित विविध योजना, राज्य आर्थिक महामंडळांशी संबंधित योजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

बैठकीत सुरूवातीला राज्यातील पूरग्रस्त भागात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक श्री. थोरात यांनी केले. बैठकीतील इतर अनुषंगिक माहिती श्री. महाडिक यांनी सादर केली. बैठकीत अग्रणी बँकेने तयार केलेल्या वार्षिक ऋण योजना 2021-22 पुस्तिकेचे विमोचन श्री. चव्हाण यांच्याहस्ते झाले. शेवटी श्री. महाडिक यांनी आभार मानले.

पीक कर्जाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा