बंद

पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

प्रकाशन दिनांक : 13/12/2021

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका) : प्रशासकीय यंत्रणांनी विविध विकास कामांच्या प्रक्रियेला गती देत वेळेत मंजूर निधी खर्च करुन विकासकाम पूर्ण करावेत असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकीत जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणांच्या एकत्रित आढावा बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बी.बी. नेमाने यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात चांगले काम केले असून कोवीड तपासणी वाढवण्‍याबरोबरच जिल्ह्यात डिसेंबर अखेर पर्यंत संपूर्ण लसीकरण करावे. तसेच जिल्हा नियोजन समितीला मंजूर झालेल्या निधीचे उपयोजन करुन जिल्ह्यातील विकास काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास वाटप केलेला निधी उपयोगात आणून ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपाययोजना तयार ठेवण्याचे निर्देश देसाई यांनी दिले. तसेच शहर पाणीपुरवठा योजना, सफारी पार्क, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यास्थिती तसेच हर्सुल कचरा डेपो उभारण्याच्या कामास गती देण्याबरोबरच कचऱ्याविषयी नागरिकांच्या तक्रारीची दखल व उपाययोजना आणि मालमत्ता कर वसूलीचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. शहरी भागात शाळा सुरू करण्यापूर्वी कोविड प्रतिबंधात्मक काळजी शिक्षण विभागाने घ्यावी व शिक्षण सुरक्षित वातावरणात सुरु करण्याच्या सूचना केल्या. महापालिका अंतर्गत रस्ताच्या कामांचा आढावा घेऊन गुंठेवारीच्या प्रकरणात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच संत एकनाथ रंगमंदिर व संत तुकाराम नाट्यमंदिराचे नुतनीकरणाचे काम पूर्ण करुन नागरिकांच्या वापरासाठी जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करावेत. या बरोबरच शहराला मार्च 2022 पासून 20 एमएलडी अधिकचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करुन अंमलबजावणी करण्याच्या सूचना महानगरपालिका आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी दिल्या.

जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा घेत असतानाच लसीकरण वाढवण्याकरता मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी – कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याच्या निर्णयामुळे लसीरकरण वाढले या प्रशासकीय निर्णयाचे स्वागत करुन तो कायम ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. याबरोबरच जिल्हा परिषेदच्या इमारत  बांधकामाच्या सद्यास्थितीचा आढावा घेऊन वेळेत इमारत बांधणीचे काम पूर्ण करण्याबरोबरच शाळाबाहय मूलांचे सर्वेक्षण करुन त्या मूलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. याबरोबरच प्रत्येक गावात जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत प्रत्येक माणशी 55 लिटर पाणी उपलब्ध करण्याबरोबरच पैठण, गंगापूर आणि वैजापूर पाणी प्रकल्पाच्या योजनेला गती देऊन गुणवत्ता पूर्ण काम करावेत असे निर्देश मंत्री देसाई यांनी जिल्हा परिषेदच्या अधिकाऱ्यांना दिले.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विविध विकास कामाचे सादरीकरण संगणकीय सादरीकरणाद्वारे आढावा बैठकीच्या सुरुवातीला केले.