बंद

पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधा उपलब्ध -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण · रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87.38%

प्रकाशन दिनांक : 13/10/2020

औरंगाबाद, दि.12 (जिमाका) :- जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मास्क वापराबाबत अधिक जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात पर्याप्त प्रमाणात कोरोना उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, आ.अंबादास दानवे यांच्यासह मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात ऑक्सीजन साठा हा आवश्यकतेनुसार पूरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याचे सांगून सद्यस्थितीत पुरेशाप्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातच ऑक्सीजन निर्मिती प्रक्रिया सुरु झाली असल्याने नजीकच्या काळातही ऑक्सीजन पूरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, असे सांगितले.

तसेच सध्या होम आयसोलेशन उपचार पध्दतीव्दारे एक हजार 916 कोरोना रुग्ण आपल्या घरी राहून डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याने रुग्णालयांवरही अधिक ताण न येता इतर गरजू कोरोना रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध होण्यास मदत होत आहे, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील रुग्णालयांच्या बेड संख्येत भरीव प्रमाणात वाढ झाली असून खासगी रुग्णालयांनी मोठ्या संख्येने बेडचे प्रमाण वाढवलेले आहे.

तसेच मा. पालकमंत्री यांच्या पुढाकारातून 100 व्हेंटीलेटर सीएसआर निधीद्वारे जिल्ह्याला लवकरच उपलब्ध करुन दिले जाणार असून त्या माध्यमातूनही अत्यावश्यक उपचार सुविधांमध्ये भर पडेल. सध्या जिल्ह्यात गरजेनुसार रेमेडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात येत असून पर्याप्त प्रमाणात कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’मोहीमेच्या सर्वेक्षणातून मोठ्‌या प्रमाणात नागरीकांची  आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केल्या जात आहे. तसेच आवश्यक असलेल्यांना वैद्यकीय उपचार दिल्या जात आहे. मास्क वापराबाबत अधिक व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून हात वारंवार धूणे, शारीरीक अंतर पाळणे, आणि मास्क वापरणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्यासाठी प्रशासन अधिक जनजागृती करीत असून लोकप्रतिनिधींनीही त्यात सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

खा.श्री. जलील यांनी शहरातील मोठ्या होंर्डीगद्वारे मास्क वापर, अंतर राखणे, याबाबत संदेश, जाहीरातीद्वारे जनजागृती करण्याबाबत सूचित केले. तसेच ग्रामीण भागातही रुग्णालयांमध्ये प्राथमिक गोष्टींची पूर्तता करुन पूर्ण क्षमतेने त्या रुग्णालय सुविधेचा वापर करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सूचीत केले. आ.श्री. दानवे यांनी जनजागृतीद्वारे लोकांना योग्य पध्दतीने मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सांगून मास्क वापराबाबत मनपा, पोलीस यांनी एकत्रित कारवाई करावी. तसेच कोवीड  उपचार , प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी शासनाकडे विशेष निधीची मागणी करावी, त्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत सूचीत केले.

अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण 5790 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून घाटी आणि जिल्हा रुग्णालयात 2646 तर खासगी रुग्णालयात 3144 इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून 87.38 टक्के आहे तर मृत्यूदर 2.70 टक्के वर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर 97534 तर ॲण्टीजन चाचण्या 273381 या प्रमाणे एकुण चाचण्या 370915 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 115 ठिकाणी 11957 आयसोलेशन बेड तर 2217 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 521 आयसीयु बेड तर287 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे 1916 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

Collectorsir_12102020