बंद

पर्यटनस्थळे आजपासून पर्यटकांसाठी खुली – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 16/06/2021

  • जिल्हयातील धार्मिकस्थळे पूर्णत: बंद
  • कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन कण्याचे अवाहन
  • व्यावसायिकांनी सात दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला या पर्यटनस्थळांमध्ये सकाळच्या सत्रात एक हजार, दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेशाची अनुमती असणार आहे. साफ सफाई, सुरक्षितता व स्वच्छता तयारी आदी विशेष बाबींसाठी संबंधित पर्यटन स्थळे, स्मारके 16 जून रोजी खुले होतील. तर संबंधित पर्यटन स्थळे, स्मारके 17 जून सकाळी सहा वाजेपासून नागरिकांच्या सेवेत असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली. तसेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळांतर्गत येणारी जिल्हयातील धार्मिकस्थळे मात्र, पूर्णत: बंद राहतील, असेही ते म्हणाले.

पर्यटन स्थळे खुली आणि कोरोना रूग्णांची संख्या कमी जरी होत असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, शारीरिक अंतर ठेवणे (6 फुट अंतर), सॅनिटायझरचा वापर, आवश्यकतेनुसार फेसशिल्डचा वापर करायला हवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

नवी दिल्लीतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निर्देशानुसार संपूर्ण राष्ट्रीय संरक्ष‍ित स्मारके व संग्रहालये उघडण्यात येतील,  असे निर्देशीत केले आहे. त्यानुसार अधिक्षण पुरातत्वविद,  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळाने पत्रान्वये सूचित केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड-19 विषयक बाधित रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे 11 जून ते 14 जून जिल्हयातील शहर क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 0.45 टक्के (Positivity)  व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णांची टक्केवारी 4.27 टक्के (Positivity ) आहे. व्यापलेले ऑक्सीजन बेड 10.80 टक्के आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण व पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या संयुक्त स्वाक्षरीने कोविड-19 संसर्ग साखळी तोडण्यासाठी (Break the Chain)  सुधारित अटी व शर्ती अंमलबजावणीस्तव पूरक आदेश निर्गमित केले आहेत.

पर्यटन स्थळांबाबतच्या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटनांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा,  2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद केलेले आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

व्यावसायिकांना आरटीपीसीआर बंधनकारक

पर्यटकांना पर्यटनांचा आनंद व्हावा, अनेक रोजगारांना मदत व्हावी, या उद्देशाने सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योगातील व्यावसायिक, खेळणी विक्रेते, फूड स्टॉल विक्रेते, गाईड आदींनी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसांत करणे बंधनकारक आहे. जर या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील; कोणतीही कोरोना आजारांची लक्षणे नसतील, अशांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्कता नाही. मात्र, त्यांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.