पदवीधर निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांची यंत्रणा सज्ज
प्रकाशन दिनांक : 03/11/2020
औरंगाबाद, दिनांक 02 (जिमाका) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांची बैठक श्री.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आणि जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी यांची उपस्थिती होती.
बैठकीत नोडल अधिकारी यांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, अनुसरायची पद्धत, कोविड 19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत श्री. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीत श्री. गव्हाणे यांनीही अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. कदम यांनी केले.
