बंद

नाथषष्ठी सुट्टीचा निवडणूक कामकाजावर परिणाम नाही -उदय चौधरीनिवडणूक कामकाज २८ मार्च रोजीही सुरू

प्रकाशन दिनांक : 01/04/2019

औरंगाबाद, दिनांक २७ (जि.मा.का.) – औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गुरुवार, दिनांक २८ रोजी प्रशासनामार्फत पैठण येथील नाथषष्ठी निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी औरंगाबाद लोकसभा निवडणूक कामकाजावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या दिवशी निवडणूक व नामनिर्देशन पत्रासंबंधीचे कामकाज सुरू राहणार असल्याचे औरंगाबाद लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले आहे.

भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक २८ मार्च रोजी अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार या दिवशी नामनिर्देशन पत्र बाबतची सर्व प्रक्रिया सुरूच राहणार आहे. नामनिर्देशन पत्रे उमेदवाराला  किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी, १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ किंवा औरंगाबाद पश्चिमच्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी (१०८) श्रीमती वर्षाराणी भोसले यांच्याकडे दिनांक चार एप्रिलपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्ट हॉल स्थित, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाबद येथे दाखल करता येईल.

नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक चार एप्रिल २०१९ असा आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक ८ एप्रिल असा आहे. दिनांक २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होईल असेही श्री चौधरी यांनी कळविले आहे

***