बंद

नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 06/05/2021

  • जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: केले रक्तदान

औरंगाबाद, दि.06, (जिमाका):- कोरोना काळात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा  उपलब्ध ठेऊन गरजू रुग्णांना  वेळेत रक्त मिळण्याच्या दृष्टीने रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पुढे यावे असे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज स्वत: रक्तदान करित जनतेला आवाहन केले.

आज मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (मसीआ) सभागृहात राईझिंग इंटंरप्रेनर ग्रुप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने वाळूज येथील उद्योगांतील कर्मचाऱ्यांच्यासाठी रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, माणिक आहेर,  उपजिल्हाधिकारी तथा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, मसीआ चे अध्यक्ष अभय हंचनाळे,  सीआयआयचे अध्यक्ष रमण अजगांवकर, सीएमआयएचे  उपअध्यक्ष शिवप्रसाद  जाजू, सचिव राहूल मोघले,  कार्यकारणी सदस्यअर्जून गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत इतर आजराने ग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये व रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध राहण्यासाठी सर्व निरोगी नागरिकांनी रक्तदानासाठी पुठे यावे .कोरोना संकट काळात उद्योगनगरीतील अधिकारी, कर्मचारी या रक्तदान शिबीराच्या माध्यमातून पुढे आले आहेत, हे कौतुकास्पद असून या शिबिरात रक्तदानासाठी सर्व नागरिकांनीही  पुढे येण्याचे आवाहनही श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकरी श्री. चव्हाण यांनी यावेळी मसीआच्या पदाधिकारी यांचेशी संवाद साधत उद्योगासंबंधीत अडचणी जाणून घेतल्या. तसेच उद्योगांनीही या कोरोना संकटकाळात सीएसआर माध्यमातून कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढे यावे असे, जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी आवाहन केले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 28 दिवसाचा कालावधी झाल्यानंतर स्वत:या शिबिरात रक्तदान केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:हून केलेले रक्तदान जनतेला खूप प्रेरणादायी असून कोरोनावरील लस घेण्याआधी व लस घेतल्यानंतरच्या योग्य कालावधीत नागरीक उत्साहाने रक्तदान करतील असा विश्वास रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मसीआ चे अध्यक्ष अभय हंचनाळे व इतर अधिकारी तसेच रायझिंग इंटरप्रिनर ग्रुपच्या राजवी वेलंगी, राधिका मानहानी, आदिती लामतुरे, रितिका गोयल यांनी व्यक्त करीत जिल्हाधिकरी यांनी रक्तदान शिबिरास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले.

हेगडेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढी येथे हे शिबीर पुढील दोन दिवस चालू राहणार आहे, असे रायझिंग ग्रुपच्या राजवी वेलंगी यांनी सांगितले.

नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करावे