• साइट नकाशा
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 12/07/2021

  • बजाज ग्रुप तर्फे मोफत कोविड-19 लसीकरणाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

औरंगाबाद, दिनांक 10 (जिमाका):- कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर या कोरोना काळात सुदृढ आरोग्याचे महत्त्वही सर्वांना पटले आहे. तेव्हा लस घेतल्यावरही सर्वांनी मास्कचा वापर, योग्य अंतर राखणे, सतत हात धुणे या त्रिसुत्रीचा वापर करत आरोग्यदायी जीवनशैलीचा अवश्य अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले.

बजाज हॉस्पीटल, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था व बजाज ऑटो ग्रुपच्यावतीने वाळूज येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल-रुक्मीणी मंदीर परिसरात मोफत कोविड-19 लसीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. यावेळी बजाज ग्रुपचे मुख्य सल्लागार सी. पी. त्रिपाठी, श्रीमती त्रिपाठी, बजाजच्या मराठवाडा विकास क्षेत्राचे रणधीर पाटील, सरपंच वैशालीताई राऊत, जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, नायब तहसीलदार निखिल धुळधर, तालुका आरोग्य अधिकारी संग्राम बामणे, विठ्ठल – रुक्मीणी मंदीर समितीचे सदस्य तसेच लसीकरणासाठी आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, वाळूज-पंढरपूरशी बजाज ग्रुपचे अनोखे नाते आहे. बजाज कंपनीने स्वत: सोबत या परिसराला विकसित केले आहे. आणि आताही सामाजिक दायीत्व स्वीकारुन येथील नागरिकांसाठी मोफत कोविड-19 लसीकरण सुरु केले हे अभिनंदनीय आहे. बजाज ग्रुप प्रमाणेच इतर कंपन्यांनीही अशाप्रकारे सामाजिक दायीत्व स्वीकारत मोफत कोविड-19 लसीकरण उपक्रम राबवित प्रशासनास सहकार्य केल्यास जिल्हा लवकर कोरोना मुक्त होईल.

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात केल्यानंतर कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण खुप कमी झाले आहे. तरी नागरिकांनी बेसावध न राहता ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ प्रमाणे वागत मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे व सतत हात धुणे  या त्रिसुत्रीचा वापर करावा. त्याचबरोबर चांगल्या आरोग्यासाठी, प्रदुषणमुक्त वातारणासाठी आपल्या परिसरात अधिकाधिक झाडे लावा. त्यामुळे आपल्यास शुद्ध प्राणवायू मिळेल व आपले आरोग्य चांगले राहील.

श्री. त्रिपाठी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कोरोना संसर्ग रोखण्याच्या कार्याचे यावेळी कौतुक केले. यापूर्वी बजाज कंपनीने आपल्या संपूर्ण कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे शंभर टक्के मोफत लसीकरण  केले आहे. तेव्हा श्रीमती त्रिपाठी यांनी गावकऱ्यांसाठीही मोफत लसीकरणाची संकल्पना मांडली तेव्हा जिल्ह्यात बजाज ग्रुपने सामाजिक दायीत्व स्वीकारत पंढरपूर गावातील पात्र लाभार्थ्यांसाठी सहा हजार मोफत कोविड-19 लसीकरणाचे आयोजन केले आहे. त्यातून जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. त्रिपाठी यांनी यावेळी केले.

नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा