बंद

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रकाशन दिनांक : 25/09/2020

औरंगाबाद, दिनांक 25 (जिमाका):  मराठवाड्यातील गोदावरी, दुधना, सिंदफना , पूर्णा आदी नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे. वेळोवेळी नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गाची माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष, औरंगाबाद येथून मिळू शकते. तेथील दूरध्वनी क्र . 0240-2351617 असा आहे, अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

            मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, माजलगाव, निम्न दुधना तसेच मध्यम प्रकल्प व उच्च पातळी बंधारे 100 % भरून नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे.  तसेच जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागातील धरणे ही 100 % भरलेली आहे व त्यांचा विसर्ग जायकवाडी धरणात येत आहे. आज 23 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणात उर्ध्व भागातून सरासरी 41, 415 क्युसेक्सने आवक येत आहे. जायकवाडी धरणाचा सांडव्यावरून 56, 592 क्युसेक्सने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीतील मराठवाड्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. धरणामध्ये येणारा येवा जास्त असला तरी जायकवाडी व निम्न दुधना प्रकल्पाद्वारे विसर्ग नियंत्रित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील व विसर्ग नियंत्रित केला जाईल . तथापि येव्यात वाढ झाल्यास विसर्गात वाढ करावी लागेल, असेही श्री. काळे यांनी कळवले आहे.