बंद

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आढावा

प्रकाशन दिनांक : 30/12/2020

औरंगाबाद, दिनांक 30 (जिमाका) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सविस्तर आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अधिकारानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत निर्देशही संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या अंमलबजावणी बाबतची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, सहायक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांची उपस्थिती होती.

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी करण्यासाठी सन 2021 मध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती, 14 एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 10 सप्टेंबर गणेश चतुर्थी, 14 सप्टेंबर गौरी विसर्जन, 19 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, 13 ऑक्टोबर सप्तमी, 14 ऑक्टोबर अष्टमी, 19 ऑक्टोबर ईद ए मिलाद, 04 नोव्हेंबर लक्ष्मीपूजन, 05 नोव्हेंबर बलिप्रतिपदा, 25 डिसेंबर ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर 2021 या उत्सव काळातील 12 दिवसांसाठी आणि उर्वरीत 03 दिवस गरजेनुसार ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी सहापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक श्री. जाधवर यांनी केले. श्री. लांजेवार, श्री. बनकर यांनीही ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत जिल्हाधिकारी यांना आवश्यक माहिती दिली.