बंद

दीपावलीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

प्रकाशन दिनांक : 03/11/2021

औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादूर्भाव लक्षात घेता दीपावली उत्‍सव 2021 साजरा करण्‍याबाबत   जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्‍या आहेत. यावर्षी 2 ते 6 नोव्हेंबर, 2021 दरम्यान दीपावली उत्सव साजरा करण्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्‍याने शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी शशीकांत हदगल यांनी कळविले आहे.

कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दीपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी. दीपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांत, रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दीपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे  नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र, त्या ठिकाणी देखील लोकांनी एका वेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन (सिव्हील अपिल) क्र. 728/2015 (निर्णय दि.23/10/2018 ) तसेच सिव्हील अपिल क्र.2865-2867/2021 (निर्णय दि 23/07/2021) मधील आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. कोविड- 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, या मार्गदर्शक सूचना असल्याचेही त्यांनी कळविले आहे.