दिव्यांग, गर्भवती, ज्येष्ठांना एनएसएस, स्काऊट गाईडची मदत- उदय चौधरी
प्रकाशन दिनांक : 01/04/2019
औरंगाबाद, दि.२५ (जिमाका) – लोकसभा मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा स्वयंसेविका विशेष काळजी घेणार आहेत. मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), स्काऊट गाईडचे विद्यार्थी सहाय्य करणार आहेत. यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दिव्यांगांना मतदानाच्या दिवशी द्यावयाच्या नियोजित सुविधांबाबत आयोजित बैठकीत श्री.चौधरी बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निलेश श्रींगी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक सतीश देशपांडे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटन आयुक्त शीतल शिंदे, शिक्षणाधिकारी बी.बी. चव्हाण, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, गर्भवती महिलांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रांबाहेरही आवश्यक साहाय्य एनएसएस आणि भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांबाहेर सहाय्य करण्याबाबतचे नियोजन शिक्षण, एनएसएस आणि स्काऊट गाईडच्या संबंधित विभागाने करावेत, अशा सूचनाही श्री. चौधरी यांनी दिल्या.
****