बंद

तृतीयपंथीयांना कोविड लस प्राधान्याने द्या – अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 22/06/2021

औरंगाबाद, दि.21, (जिमाका) :- कोविड-19 या महामारीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना कोविड लस प्राधान्याने देऊन त्यांना संरक्षित करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी आज येथे संबंधितांना दिल्या.

तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारी संदर्भात जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षाराणी भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, कौशल्य विकास रोजगारचे बी.आर.रिठे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त पी.जी.वाबळे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची लोकसंख्या, तृतीयपंथीयांची यादी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्राप्त करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देत श्री.गव्हाणे म्हणाले की, तृतीयपंथीय व्यक्तींना रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड यांच्यासह सर्व सोयी सुविधायुक्त अशा गरजेच्या पुर्ततेकरीता माहिती गोळा करावी तसेच तृतीयपंथीयांना प्राधान्याने कोविड लस देण्यात यावी अशा सूचना केल्या.

तृतीयपंथीयांना सामाजिक विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता तसेच या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता व शासनास उपाय योजना सुचविण्याकरिता तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थातील दोन तृतीय पंथीय व्यक्ती निवडीकरिता यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक आज घेण्यात आली.

या समितीमार्फत तृतीयपंथीयांच्या तक्रारींचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करण्यात येणार असून या समितीमार्फत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा, समस्यांचा, तक्रारींचा सखोल अभ्यास करुन या उपाययोजना शासनास सुचविण्यात येणार आहे.

तृतीयपंथीयांना कोविड लस प्राधान्याने द्या