बंद

तरुणांनी आर्मी भरतीमध्ये सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 05/07/2022

औरंगाबाद दि 04 (जिमाका): औंरगाबाद मध्ये 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान आर्मीची भरती होणार आहे. या भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी आणि जळगांव या जिल्ह्यातील तरुण सहभागी होणार आहेत. तेव्हा या भरतीमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

          जिल्हाधिकारी कार्यालयात या भरतीच्या अनुषंगाने 1 जुलै रोजी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कर्नल प्रवीण कुमार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजन फिरासत उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी म्हणाले अर्ज करण्याची प्रक्रीया पूर्णपणे ऑनलाईन स्वरुपाची आहे. तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रीया पूर्ण करावी. प्राप्त अर्जाची छानणी इंडियन आर्मीव्दारे होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर भरती संदर्भातील शारिरीक चाचणी तसेच संबंधित प्रक्रीया पार पडणार आहे. ही भरती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे. तेव्हा तरुणांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.