बंद

तपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 22/08/2020

आठवडी बाजारांच्या गावातील चाचण्यांवर भर द्यावा

गणपती आणि मोहरम सणादरम्यान प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा

औरंगाबाद, दिनांक 21 (जिमाका) :  औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व यंत्रणांची टीम चांगली आहे.  कोविड प्रादुर्भावास 152 दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये सर्वांनी चांगले काम केले, परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी संपूर्ण महसूल यंत्रणेने सर्वांच्या सहकार्याने तपासणी, शोध आणि उपचार या तंत्राचा वापर करून कोरोनास अटकाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. तसेच प्रत्येक नागरिकाला मास्कच्या वापराबाबत जागृत करून वापरण्यास बंधनकारक करावे. आठवडी बाजारांच्या गावांमध्ये अधिकाधिक चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व महसूल यंत्रणेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी श्री.चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी’कोरोना योद्धा’ व त्याच्या परिवारास तत्काळ आवश्यक ती मदत होऊन त्यांचे आत्मबल वाढावे, कोविड-19 या संसर्गाच्या अनुषंगाने कामकाज करताना त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासन आहे, अशी त्यांच्यात भावना निर्माण व्हावी या उद्देशाने ‘कोरोना योद्धा’, त्यांच्या परिवारास तत्काळ मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रतिसाद कक्षाची’ स्थापना करण्यात आली आहे, असे सांगितले. तसेच कोरोना आजार बरा होण्याचा दर हा 75 टक्के आहे. त्यामुळे या आजाराला घाबरून न जाता, स्वतःची काळजी घ्या. व्यायाम करा. काढा घ्या. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करा. आठवडी बाजाराच्या गावांमध्ये मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्यावर भर द्या, त्याचे नियोजन करा. अन्य विभागाच्याही मनुष्यबळाचा वापर करा. मास्क वापरण्याबाबत जनजागृती निर्माण करा, भरारी पथके नेमा. रुग्ण शोधण्यावरही भर द्या. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी, लोकप्रतिनिधींची मदत घ्या. कोविड केअर केंद्रांवर लक्ष द्या. त्याबरोबरच गणपती, मोहरम सणामध्ये साधेपणाने व नियमानुसार उत्सव साजरा करण्याचे आवाहन करा. सण आनंदात, उत्साहात साजरा करा, परंतु नियमांचे पालन होईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्या. याबाबत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्यावत ठेऊन सर्व साधनसामुग्रींची तपासणी करा. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याबाबत यंत्रणा अद्ययावत करा. गावातील अत्यावश्यक सेवा, उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रणा, साधसामुग्री, धान्याचा साठा, संवादासाठी यंत्रणा आदींची तपासणी करा. गणेशोत्सव, मोहरम काळात कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना तत्काळ करा. नवनवीन उपक्रमांवर भर देऊन मोबाईल विसर्जन टँक, विसर्जनाच्या दिवशी मूर्ती गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आदी स्वरुपाच्या नवनवीन उपाययोजना करा. तसेच कोविडकाळात स्वत्:सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचीही काळजी घ्या, अशा सूचना श्री.चव्हाण यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना केल्या.

सुरूवातीला अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांनी तालुकास्तरावरून जिल्ह्यात कोविड रुग्णांना उपचारासाठी कुठे पाठवायचे याची रूपरेषा ठरवून घेण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी यांना दिले. यामध्ये रुग्णाच्या परिस्थितीवर रुग्णास आवश्यक असणाऱ्या रुग्णालयात संदर्भित करावे. सर्व संबंधित यंत्रणांचे संपर्क क्रमांक तालुका स्तरावर प्रसिद्ध करावेत. रुग्णवाहिकाचेही संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावेत. वेळोवेळी जिल्हा प्रशासनास रुग्णांची माहिती अद्यावत पाठविण्यात यावी. खासगी रुग्णालयात बिलासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आठवडी बाजारांच्या गावांमध्ये अधिकाधिक चाचणी कराव्यात या संकल्पनेत प्रत्यक्षात उतरवावे व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणावे. रुग्णवाहिका नसतील तर खाजगी वाहनांना रुग्णवाहिका म्हणून वापरण्यात यावेत,  रुग्ण वाहिकेसाठी मागणी नोंदवावी, असेही श्री. गव्हाणे यांनी सांगितले. तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. जाधवर यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्वांना प्रेरीत करावे, तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असे सर्व अधिकाऱ्यांना सांगितले. उपजिल्हाधिकारी श्रीमती मैत्रेवार यांनीही कंटेंटमेंट झोनबाबत अद्यावत माहिती कार्यालयास वेळेत पाठविण्यात यावी, असे सांगितले.

तपासणी, शोध आणि उपचाराचे तंत्र वापरून कोरोनाला अटकाव करा