बंद

तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रकाशन दिनांक : 02/08/2021

  • लोकशाही दिनात 5 अर्जांवर सुनावणी.
  • विनामास्क तक्रारदारास आकारला दंड

 

औरंगाबाद, दिनांक 2 (जिमाका) : नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. त्या पार्श्वभूमिवर लोकशाही दिनी प्रत्येक विभागाने त्यांच्या अंतर्गत प्राप्त तक्रारींवर तत्काळ योग्य ती कार्यवाही करून निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज झालेल्या लोकशाही दिनात दिले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (साप्रवि) रिता मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक अनिल कुमार दाबशेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या लोकशाही दिनात एकुण 5 तक्रारी दाखल झाल्या. यात जिल्हा परिषद-1, पोलीस विभाग-1 व महसूल विभाग-3 अशा एकुण 5 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. तर इतर 13 निवेदने अर्जदारांमार्फत सादर करण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यात तालुका स्तरावर निपटारा न झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकशाही दिनात आपली तक्रार घेऊन आलेले अर्जदार सुरेश काळे यांनी कोरोना प्रतिबंधक नियमाचे म्हणजे चेहऱ्याला मास्क लावण्याचे पालन न केल्याने तत्काळ 500 रू. दंड लावण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे सर्व नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागृत राहतांना कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्ष रहावे व कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले.

तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश