जिल्ह्यात बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव नाही -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 13/01/2021
- यंत्रणा सतर्क
- नियंत्रण कक्षासह नऊ रॅपीड रिस्पॉन्स टीम स्थापन
- नागरीकांनी घाबरू नये
औरंगाबाद, दिनांक, 13 (जिमाका): औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लु या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नसून राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणा सतर्कतेसह सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बर्ड फ्लु रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात पक्षांमध्ये आढळून येणारा हा रोग रोखण्यासाठी यंत्रणा तयारीनिशी सज्ज असल्याचे सांगून जिल्ह्यातील कुक्कुटपालन केंद्र चालकांना याबाबतच्या मार्गदर्शक सूचना, माहिती देण्यात आली आहे. अद्याप जिल्ह्यात अशा प्रकारचा कोणताही संसर्ग आढळून आलेला नाही. तरी नागरीकांनी घाबरू नये. तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18002330418 वर फोन करावा किंवा जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा. बर्ड फ्लु रोगाच्या नियंत्रणा करीता जिल्हा स्तरावर जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय, खडकेश्वर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर रॅपीड रिस्पॉन्स टीम (RRT) ठेवण्यात आलेली आहे.
तसेच अंडी व कुक्कुट मांस किमान 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर 30 मिनीटे शिजवुन खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे अर्धवट शिजवलेले मांस किंवा कच्चे चिकन, कच्ची अंडी खाऊ नये. तसेच बर्ड फ्लु रोगाबाबात शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नयेत, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी यावेळी केले.
औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही कोणत्याही प्रकारच्या पक्षांत अनैसर्गिक मृत्यू झाल्याचे आढळुन आले नाही. जिल्ह्यातील जायकवाडी, नांदुर मधमेश्वर यासारख्या मोठी धरणे, तलाव इतर ठिकाणी किंवा स्थलांतरीत पक्षी यांच्यामध्ये असाधारण मृत्यू आढळुन आलेला नाही. त्याचप्रमाणे भारतात गेल्या वीस वर्षात पक्षांमध्ये आढळुन येणाऱ्या या रोगामुळे कुठल्याही प्रकारचा संसर्ग झालेला रूग्ण आढळुन आलेला नाही. तरी नागरीकांनी खबरदारी घ्यावी, असे पशुसंवर्धन उपायुक्त प्रशांत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये पशुपालक अथवा इतर कोणत्याही व्यक्ती, शासनत्तर संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद सलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीत माहिती ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व ही माहिती नजीकच्या उपलब्ध पशुवैद्यकीय स्वरूपात कळविणे बंधनकारक आहे.
तसेच जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षामध्ये मर्तूक झाल्याचे आढळुन आल्यास किंवा व्यवसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात मर्तुक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजीकच्या पशूवैद्यकीय दवाखान्ययास माहिती द्यावी. मृत पक्षास हात लावु नये, शव विच्छेदन करून परस्पर विल्हेवाट लावु नये, असे श्री. चौधरी यांनी सांगितले.
