बंद

जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 15/09/2020

* जिल्ह्याचा रूग्ण वाढीचा दर 76, तर मृत्यूदर 2.79 टक्के

* शासकीय रूग्णालयांमध्ये खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत

* महिना अखेर 1808 खाटांची वाढीव उपलब्धत

* कोविड केअर सेंटर खासगी रूग्णालयांतर्गत संलग्ण करणार

औरंगाबाद, दि.14 (जिमाका) :-  जिल्ह्यातील रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन सुविधा ठेवण्यासाठी यंत्रणा सतर्क असून जिल्ह्यात पुरेसा ऑक्सीजनसाठा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते. बैठकीला आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रदीप जैस्वाल,आ.संजय सिरसाट, आ.अतुल सावे, आ.अंबादास दानवे, पोलीस आयुक्ती निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी,यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी जिल्ह्यातील कोरोना उपचारांच्या क्षमता अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रशासन प्राधान्याने डॉक्टर्सची संख्या, खाटांची उपलब्धता वाढवण्यास भर देत आहे, असे सांगून वाढत्या रूग्णांवर तातडीने योग्य उपचार होण्यासाठी शासकीय रूग्णांलयांमध्ये खासगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या असून त्याअंतर्गत मोठ्या संख्येने डॉक्टर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. 1 लाख 25 हजार रू. मानधनावर या खासगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या असून इंडीयन मेडीकल असोशीएशनने दिलेल्या यादीतील सत्तर डॉक्टर्सच्या सेवा पहिल्या टप्प्यात अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर त्यांनाही शासकीय रूग्णालयात (घाटी) सेवा देण्यासाठी अधिग्रहीत केले जाणार आहे. अधिग्रहीत डॉक्टर्स घाटी, जिल्हा रूग्णालय, मनपा आरोग्य रूग्णालय या ठिकाणी सेवा देतील, असे सांगून श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यात लिक्वीड ऑक्सीजनची मागणी वाढलेली असून हा ऑक्सीजनसाठा पूण्याहून मागवण्यात येतो. गेल्या दोनचार दिवसात पुरवठा प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबींमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने ऑक्सीजन मागवण्यात विलंब झाला होता पण ती प्रक्रिया सुरळीत केली असून जिल्ह्याच्या मागणीनुसार सद्यस्थितीत पूरेशा प्रमाणात ऑक्सीजनसाठा उपलब्ध आहे. तसेच सध्याची आरोग्यक्षेत्राची गरज लक्षात घेऊन 80 टक्के वैद्यकीय तर 20 टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी या प्रमाणेच ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या रूग्ण संख्येच्या प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध करून दिल्या जात आहे.

तसेच रूग्ण वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन खाटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व रूग्णालयांनी दिले असून त्यांच्या निर्देशाप्रमाणे या महिनाअखेर शासकीय आणि खासगी अशा सर्व रूग्णालयांत 1808 पर्यंत खाटांची वाढीव उपलब्धता होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

आ. हरिभाऊ बागडे यांनी ग्रामीण भागातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात अधिक जनजागृती करून ग्रामीण स्तरावरील यंत्रणांना त्याबाबत कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत फक्त व्हेंटीलेटरवरच्या रूग्णांनाच सवलत दिल्या जात आहे, मात्र कोरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब रूग्णांना या निकषामध्ये शिथिलता आणुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच लक्षणे असलेल्या पण तपासणी अहवाल न आलेल्यांना तातडीने दाखल करून घ्यावे. जेणेकरून त्यांच्याव्दारा होणारा संसर्ग लवकर रोखता येईल, असे श्री. बागडे यावेळी म्हणाले.

आ. शिरसाट यांनी वाढत्या रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व आवश्यक रूग्णांना खाटा, उपलब्ध होण्याच्या दृष्टीने क्वारंटाइन सेंटर खासगी रूगणालयांना उपचार करण्यासाठी दिल्यास मोठ्या संख्येत अतिरीक्त खाटा रूगणालयांकडे उपलब्ध होतील, तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रूग्णांनी घरातच राहणे, नियमांचे पालन करणे बंधनकारक असून त्यांच्याव्दारा याचे पालन होण्यासाठी नियंत्रण अधिक प्रभावी करावे, अशा सूचना केल्या.

आ. जैस्वाल यांनी बाजारपेठ व इतर सर्व दुकाने बंद करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून सर्वांनाच त्या ठराविक वेळेपर्यंत दुकान, व्यवहार बंद करणे बंधनकारक करावे, असे सूचीत केले.

आ. सावे यांनी जिल्ह्यातील आयसीयु बेड आणि व्हेंटीलेटर खाटांची संख्या तातडीने वाढवणे गरजेचे असून त्याप्रमाणात डॉक्टर, नर्सेस, सेवकांची संख्या वाढवणे, त्यासाठी वेतनश्रेणीत वाढ करणे या बाबी तातडीने करून पूरेसे मनुष्यबळ घाटीला उपलब्ध करून देण्याचे सूचीत केले.

आ. दानवे यांनी खाटांची संख्या, ऑक्सीजन साठा वाढवणे गरजेचे असून संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घ्यावा, असे सांगितले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी खाटांची संख्या वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटर हे खासगी रूग्णालयांसोबत संलग्न करण्यात येणार आहे. जेणेकरून रूग्णांना गरजेनुसार संबंधित रूग्णालय पूढील उपचार सुविधा उपलब्ध करून देईल. ऑक्सीजन पुरवठा व्यवस्थितपणे नियंत्रीत होत असून लक्षणे नसलेल्यांनी होम क्वारंटाइन होऊन उपचार घेतल्यानेही आवश्यक रूग्णांसाठी खाटा, उपचार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असे श्री. पांडेय यांनी सांगितले.

जिल्ह्याचा रूग्ण वाढीचा दर वाढत असून सध्या 76 टक्के दराने रूग्ण बरे होत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूदर कमी करण्यात यश मिळत असून 2.79 टक्के वर मृत्यूदर आला आहे. रूग्ण बाधिताचे प्रमाण 8.38 तर चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आटीपीआर 8.493 तर ॲण्टीजन चाचण्या 232944 या प्रमाणे एकुण चाचण्या 313437 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 108 ठिकाणी 12664 आयसोलेशन बेड तर 1491 ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 488 आयसीयु बेड तर 230 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. 1040 रूग्ण होम आयसोलेशन पद्धतीने उपचार घेत आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षण मोहिमेच्या अंमलबजावणीच्या नियोजनाचीही माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिली.

जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध