बंद

जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ – अपर जिल्हाधिकारी डॉ गव्हाणे

प्रकाशन दिनांक : 06/10/2020

• 3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध

औरंगाबाद, दि.05 (जिमाका) :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.69 टक्के झाले आहे. त्याचसोबत उपचार सुविधांमध्ये वाढ करण्यात येत असून जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना खाटा वाढवण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ झाल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी समवेतच्या कोरोना आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे बोलत होते. बैठकीला खा. इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ.संजय शिरसाठ, आ. प्रदिप जैस्वाल ,आ. अतुल सावे, आ.अंबादास दानवे यांच्यासह पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, मनपा उपायुक्त श्री. नेमाडे, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून रुग्णालयात दाखल रुग्ण संख्याही कमी होत आहे. त्याच प्रमाणे मृत्यूदर ही कमी करण्यात यश येत असल्याचे सांगून जिल्ह्यात पूरेशा प्रमाणात रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून सध्या एकूण 3008 रेमेडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध असून घाटी आणि जिल्हा रुग्णालयात 1723 तर खासगी रुग्णालयात 1285 असे एकूण 3008 इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच रुग्णांना तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनामार्फत संबंधितांना आवश्यक सहकार्य केले जाणार असून औषध निरीक्षक वर्षा महाजन यांच्याकडे 9767270368 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन इंजेक्शन उपलब्धते बाबत माहिती घेता येईल. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते असून मृत्यूदर 2.69 टक्के वर आला आहे. चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यामध्ये आरटीपीसीआर 94673 तर ॲण्टीजन चाचण्या 267766 या प्रमाणे एकुण चाचण्या 362439 इतक्या झाल्या आहेत. तसेच डिसीएचसी, डिसीएच, डिसीसीसी अशा एकुण 108 ठिकाणी 13713 आयसोलेशन बेड तर 2031ओटु बेड उपलब्ध आहे. तसेच 526 आयसीयु बेड तर 230 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत, होम आयसोलेशनद्वारे 1876 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी यावेळी दिली.

रुग्णांच्या नातेवाईकांना रेमेडीसीवीर इंजेक्शन कुठे उपलब्ध होईल यासाठी अन्न व औषध प्रशासनाने तातडीने मदत करावी, असे खा. जलील, आ. सावे, आ. दानवे यांच्यासह सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचीत केले. आ. शिरसाठ यांनी ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह, रक्तदाब, ह्यदयरोग, यासह इतर गंभीर आजारही आहेत, अशा रुग्णांवर कोरोनाच्या उपचारासोबतच त्यांच्या इतर आजारांवरही उपचार होणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांच्या इतर आजारालाही नियत्रिंत ठेऊन त्या रुग्णांची तब्येत बिघडणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेतल्या जाईल, असे सूचीत केले. डॉ. येळीकर यांनी कोरोना विषाणू हा प्राणघातक ठरणारा असल्याने त्याच्यावर प्राधान्याने उपचार केले जात असून कोरोना रुग्णांमध्ये ज्यांना इतर आजाराचा त्रास आहे त्यावरही आवश्यक औषधोपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.

घाटी रुग्णालय परिसरात तीन दिवसांपूर्वी महिला निवासी डॉक्टरसोबत रात्रीच्या वेळी गैरवर्तणूकीचा प्रकार घडला. त्याबाबत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी त्या घटनेची गंभीर दखल घेत घाटीतील सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्याबाबत सूचीत केले. घाटी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा, पथदिवे बसवण्यासाठी तातडीने डीपीसीतून घाटीला निधी द्यावा. त्याठिकाणी पोलीस सरंक्षण वाढवावे, असे सर्व लोकप्रतिनिधींनी यावेळी सूचीत केले.

तसेच खा. जलील यांनी घाटीतील अपप्रकारांवर आळा घालून डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनात वाढ करणे गरजेचे असून रुग्णालयाच्या शासकीय निवास परिसरात नियमबाह्यपणे वास्तव्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने घाटी प्रशासन आणि पोलीसांनी सयुक्तपणे सर्वेक्षण करुन नियमबाह्य वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सूचित केले.आ. दानवे यांनी संबंधित प्रकरणातील दोषींचा शोध घेऊन तातडीने त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याबाबत सूचित केले. त्याचप्रमाणे घाटी परिसरातील सर्व ठिकाणी, रस्त्यांवर पथदिवे, सीसीटिव्ही कॅमेरा बसवण्यात येऊन घाटीमध्ये विनाकारण थांबणाऱ्या बाहेरच्या व्यक्तींना, रिक्षावाल्यांना प्रतिबंध घालावा. रुग्णालय आवारातील विविध भागात अवैधरित्या घोळक्यांनी जमा होणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, असे आ.अतुल सावे, आ. प्रदिप जैस्वाल, आ. हरिभाऊ बागडे,आ. संजय शिरसाठ यांनी यावेळी सांगितले.

तसेच घाटीतील आंतरवासिता डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींनी सूचना केली. त्यानुसार लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

उपायुक्त मीना मकवाना यांनी निवासी महिला डॉक्टर सोबत झालेल्या गैरवर्तणूक प्रकरणात पोलीसांकडे गुन्ह्याची नोंद झाली असून रुग्णालय परिसरात दामिनी पथक , पोलीस पेट्रोलींगसह महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगून पोलीस प्रशासनामार्फत घाटीच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात आठशे खाटांची वाढ